आता चाबकाने 'थर्टीफर्स्ट' करायचा का?- उद्धव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

मोदीबाबांनी मृगजळ दाखवले
नोटाबंदीचे मृगजळ मोदीबाबांनी नागरिकांना दाखवले आहे. त्याचा पाठलाग करण्याच्या नादात सामान्यांच्या नशिबी आलेली पायपीट थांबत नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते 50 दिवस मला द्या, नाही तर चाबकाने फोडा. हे 50 दिवस 30 डिसेंबरला पूर्ण होत आहेत. मग करायचा का थर्टीफर्स्ट, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नोटाबंदीवरून पंतप्रधानांवर आसूड ओढला.

धुळे, नंदुरबारमधील विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्या वेळी "शिवसेना भवन'मध्ये झालेल्या कार्यक्रमात ठाकरे यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला. नोटाबंदीचा त्रास होतोय, असे म्हणेल तो बेइमान. मग इमानदार कोण, हा प्रश्‍न कुणी विचारायचा नाही, असा टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले, की मोठ्या अपेक्षेने तुम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि अगदी भाजपच्याही पाठीशी राहिलात; पण अडचणी काही सुटत नाहीत. शिवस्मारकाचे भूमिपूजन झाले त्या सभेत 50 दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होत जाईल, अशी घोषणा मोदींनी केली; पण हा त्रास कधी कमी होणार कळत नाही. सगळे काही चांगले होईल, या आशेवर आपण जगतोय; पण ही वेडी आशा चालणार नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.

भाजपच्या "सबका साथ, सबका विकास' या घोषणेचीही त्यांनी खिल्ली उडवली. "सबका साथ, सबका विकास' हे असले काही नाही. मला प्रामाणिकपणाने तुमची साथ हवी आहे. तुमची ताकद हवी आहे. तिचा उपयोग मी तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray criticize Narendra Modi on demonetization issue