
शिंगावर घेणार! सभेआधीच शिवसेनेने ठणकावलं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी बीकेसी मध्ये सभा घेणार आहेत. राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. भोंग्यांचं प्रकरण, हनुमान चालिसावरून सुरू असलेल्या काँट्रोव्हर्सीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र, राज ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेनाही जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं स्पष्ट झालंय. याआधीच शिवसेनेकडून सभेसाठी टीजर प्रदर्शित करण्यात आले होते. (CM Uddhav Thackeray to Hold Rally in BKC)
हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायला पाहिजे, असं म्हणत शिवसेनेने कार्यकर्त्यांना साद घातली आहे. गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. महापालिकेत भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपनेही पोलखोल सभा घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुकलं आहे. या सगळ्यावर उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. सभेआधीच शिवसेनेने सामना या मुखपत्रातून विरोध करणाऱ्यांना ठणकावलं आहे.
हेही वाचा: मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत असताना वीजपुरवठा खंडित...
नकली हिंदुत्ववाद्यांचे मास्क उतरवले जाणार
अंगावर येईल त्याला शिंगावर घेणार. आज शनिवारी हिंदुत्वाच्या हुंकाराचा टणत्कार होणार! शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ आज वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात धडाडणार असून नव आणि नकली हिंदुत्ववाद्यांचे मास्क उतरवले जाणार आहेत.
शिवसंपर्क अभियानांतर्गत होणाऱया सभेची जय्यत तयारी आणि महाराष्ट्रासह देशभरातून मुंबईच्या दिशेने येणाऱया शिवसैनिकांची संख्या पाहिली तर ही महासभा निश्चितच गर्दीचे विक्रम मोडणारी ठरणार असल्याचं शिवसेनेने म्हटलंय.
शिवसैनिकांनी राणांचा बंदोबस्त केला
हनुमान चालिसाच्या नावाखालीही स्टंटबाजी करून काहींनी शिवसेनेवर आरोप केले. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. लाखो शिवसैनिकांची पंढरी असलेल्या ‘मातोश्री’बाहेर येऊन हनुमान चालिसा पठणाचे इशारे दिले. शिवसैनिकांनी त्यांचा बंदोबस्त केला, पण त्या बेगडी हिंदुत्ववाद्यांच्या बोलवित्या धन्याचा समाचार उद्धव ठाकरे या सभेमध्ये घेणार आहेत. उद्धव ठाकरे काय बोलणार याबद्दल विरोधकांच्या गोटामध्येही चलबिचल सुरू आहे.
Web Title: Uddhav Thackeray To Hold Rally In Bkc
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..