शस्त्राने नाही, सेवेने युद्ध जिंकू; मुख्यमंत्र्यांनी लिहिले कोरोनायोद्ध्यांना आभारपत्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

महाराष्ट्राच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या कोरोना योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे, असे आवाहन त्यांनी प्रत्येक कोरोनायोद्ध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात केले आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या कोरोना योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे, असे आवाहन त्यांनी प्रत्येक कोरोनायोद्ध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात केले आहे.

मोठी बातमी ः हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध ठरतंय धोकादायक; आयसीएमआरनेही दिले महत्वाचे निर्देश 

आपणा सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची महान परंपरा आहे. संकटकाळात तो मागे हटत नाही, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांप्रमाणे कणखर होतो. आज आपण सगळेच कोरोनाच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत, हे युद्ध साधे नाही. या संकटात आपण कोरोनायोद्धा म्हणून मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.

मोठी बातमी ः लॉकडाऊननंतर मुंबईतील प्रवासी वाहतुकीवर होणार मोठा परिणाम; कसा? घ्या जाणून...

कोरोनाचे हे युद्धसुद्धा सीमेवरील सैनिकांप्रमाणेच लढावे लागेल. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक जणू आज एक सैनिक बनून संकटाचा मुकाबला करताना दिसत आहे. आपणासारखे कोव्हिडयोद्धे आता युद्धात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून मोठे बळ  मिळाले आहे. ही एक प्रकारे देश आणि देवपूजाच आहे, हीच आपली संस्कृती आहे. शस्त्रापेक्षा ही मोहीम आपल्याला सेवेने जिंकायची आहे.  थोडक्यात सेवा हेच आपले शस्त्र राहील, असे त्यांनी नमूद केले आहे.  हा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जनता आपल्या रक्ताची आणि नात्याचीच आहे. महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपण पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. आपले आभार कसे मानावेत?  ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रुजू झाल्याशिवाय राहणार नाही, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

मोठी बातमी ः शहरात कोरोनाचे संकट; तर गावाकडे चाकरमान्यांसमोर अडचणींचे डोंगर

राज्यात 21 हजार 752 अर्ज
परिचारिका, फार्मासिस्ट, डॉक्टर,  सामान्य स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, पॅरामेडिक, इतर वैद्यकीय व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, शिक्षक, संरक्षण सेवा, सुरक्षा रक्षक, सैन्य वैद्यकीय संस्थेतील लोक अशा विविध क्षेत्रांतून मुंबईसह महाराष्ट्रात 21 हजार 752 जणांनी कोव्हिडयोद्धे होण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांच्यात वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांची संख्या 12 हजार 103, तर इतर क्षेत्रांतील 9649 आहे. विशेष म्हणजे, 3716 कोव्हिडयोद्ध्यांनी रेड झोनमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

मोठी बातमी ः दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

मुंबईसाठी 3766 तयार
राज्यात कोव्हिडयोद्ध्यांसाठी आलेल्या अर्जांमधील 3766 अर्ज मुंबईसाठी आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील अर्जांची संख्या 1785 असून, इतर क्षेत्रांतील 1981 अर्ज आहेत.  मुंबईतील जम्बो उपचार सुविधांसाठी काम करण्याची तयारी दाखवलेल्या सर्व कोव्हिदयोद्ध्यांना महापालिकेमार्फत नियुक्तिपत्र दिले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackeray writes letter to corona worriors to praise their work