उल्हासनगरातील डंपिंग ग्राऊंडवरील दुर्गंधीवर काढला जाणार तोडगा

दिनेश गोगी
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

उल्हासनगर: डंपिंग ग्राऊंड मधून येणारी दुर्गंधी तसेच मृत जनावरे यांच्यावर प्रक्रिया करून दुर्गंधीच्या समस्येवर तोडगा काढण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी दिले आहे. त्यामुळे आजचे (शुक्रवार) बेमुदत उपोषण व 3 डिसेंबरला लोकशाही दिवशी केले जाणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, लोकशाही दिनाला संत प्रभाराम मंदिर येथे डंपिंग ग्राऊंड हटवण्यासाठी शांततापूर्ण विरोध प्रदर्शन केले जाणार आहे.

उल्हासनगरात कॅम्प नंबर 5 मधील खदाणीत थाटण्यात आलेल्या डंपिंग ग्राऊंड मुळे स्थानिक सह सभोवतालच्या परिसरातील नागरिक मेटाकुटीस आले आहेत. सातत्याने पेटत राहणाऱ्या या डंपिंग मधून निघणाऱ्या धुरातील दुर्गंधी व डंपिंगवर टाकण्यात येणाऱ्या मेलेल्या जनावरांच्या वासाने नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत शिवसेनेने मोर्चा काढला. वज्र, प्रबल संगटनेने या डंपिंगच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवली. कायद्याने वागा लोकचळवळच्या वतीने पोस्टर्स झळकवण्यात आली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी डंपिंगची धग मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केले होते. आज शिवसेनेचे माजी नगरसेवक धर्मा पाटील यांच्या सोबत डॉ. जानू मानकर, शिवाजी दुधकर, अंकुश जाधव, ज्ञानेश्वर करवंदे यांनी बेमुदत उपोषण जाहीर केले होते. राष्ट्रवादी नगरसेवक सतरामदास जेसवानी, भाजपा नगरसेवक किशोर वनवारी, सामाजिक कार्यकर्ते शैलेश पांडव यांनी 3 डिसेंबर रोजी धरणे आंदोलनचा इशारा दिला होता.

या बेमुदत उपोषण, धरणे आंदोलनाच्या इशाऱ्याला पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी गांभीर्याने घेतले. रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रस्टच्या वतीने पेटणारा सुका कचरा व प्लॅस्टिक वेगळे करण्यात येणार, मृत जनावरांना तिथे गाडून व मीठ टाकून विल्हेवाट लावण्यात येणार, बायोसॅनिटायझर प्रक्रिये द्वारे दुर्गंधी कमी करण्यात येणार असे लेखी आश्वासन हांगे यांनी दिले आहे. त्यामुळे उपोषण व धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

दरम्यान, आयुक्तांच्या आश्वासनामुळे उपोषण, धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी 3 डिसेंबर रोजी लोकशाही दिनी डंपिंगच्या विरोधात संत प्रभाराम मंदिर येथे शांततापूर्ण विरोध प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती वज्र संघटनेचे शशिकांत दायमा यांनी दिली.

Web Title: ulhasnagar dumping ground issue