उल्हासनगर पालिकेत २० वर्षांत १६ महिला महापौर

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - महापौरपदाच्या आरक्षणात उल्हासनगरचे महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या स्थापनेला २० वर्ष झाली असून, त्यातील १६ वर्षांची कारकीर्द ही महिला महापौरांनी हाताळली आहे. पुरुषांच्या वाट्याला अवघ्या चार वर्षांचा कालावधी आला आहे. 

उल्हासनगर - महापौरपदाच्या आरक्षणात उल्हासनगरचे महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या स्थापनेला २० वर्ष झाली असून, त्यातील १६ वर्षांची कारकीर्द ही महिला महापौरांनी हाताळली आहे. पुरुषांच्या वाट्याला अवघ्या चार वर्षांचा कालावधी आला आहे. 

उल्हासनगर पालिकेत  ५ एप्रिल १९९७ मध्ये शिवसेनेचे गणेश चौधरी यांना प्रथम महापौरपदाचा मान मिळाला. त्यानंतर शिवसेनेच्याच यशस्विनी नाईक या पहिल्या महिला महापौर ठरल्या. पुढे फक्त १३ दिवसांसाठी अपक्ष नगरसेवक कुमार आयलानी हे महापौरपदी विराजमान झाले होते. दरम्यान, सत्तापरिवर्तन होऊन काँग्रेस आघाडीची सत्ता आली आणि काँग्रेसचे हरदास माखिजा हे महापौरपदी  विराजमान झाले. ते तीन वर्ष महापौर होते. त्यांचा कार्यकाळ संपला आणि अनुसूचित महिलेसाठी महापौरपदाचे आरक्षण निघाले. त्या वेळी काँग्रेसच्या मालती करोतिया यांची वर्णी महापौरपदी लागली. त्या १० महिने महापौरपदी होत्या. २१ फेब्रुवारी २००५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापौरपदाची माळ ज्योती कलानी यांच्या गळ्यात पडली. त्या दोन वर्षे या पदावर होत्या. २००७ च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी महापौरपदाचे आरक्षण निघाले. तेव्हा साई पक्षाच्या लीलाबाई आशान यांची वर्णी महापौरपदी लागली. त्यानंतर २००८ मध्ये शिवसेनेच्या विद्या निर्मळे या महापौर झाल्या. यानंतरचे आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी निघाले होते. शिवसेनेच्या राजश्री चौधरी यांनी महापौरपदाचा कालावधी तीन वर्ष सांभाळला. 

२०१२ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर शिवसेना-भाजप-रिपाइं-मनसे व साई पक्षाने सत्ता स्थापन केली. या वेळी महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी होते.  
महायुतीच्या सत्तेत साई पक्षाच्या आशा इदनानी व शिवसेनेच्या अपेक्षा पाटील ओबीसी यांनी प्रत्येकी अडीच वर्षांची कारकीर्द हाताळली होती.

Web Title: ulhasnagar municipal 16 female mayor in 20 years