भाजप बॅकफूटवर! उल्हासनगर पालिकेत स्थायी समिती सभापतीपदाची चुरस

दिनेश गोगी
Tuesday, 27 October 2020

संख्याबळामुळे स्थायी समिती सभापति पदासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या विजय पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन सभापति पद निवडणुकीला कलाटणी दिली. मंगळवारी भाजपचे स्थायी सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने भाजप संख्याबळाअभावी बॅकफुटला गेली असून शिवसेना महापौरपदाप्रमाणेच स्थायी समिती सभापतिपद अर्थातच तिजोरीच्या चाव्याही भाजपकडून बळकावण्याची चिन्हे आहेत. 

उल्हासनगर : संख्याबळामुळे स्थायी समिती सभापति पदासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या विजय पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन सभापति पद निवडणुकीला कलाटणी दिली. मंगळवारी भाजपचे स्थायी सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने भाजप संख्याबळाअभावी बॅकफुटला गेली असून शिवसेना महापौरपदाप्रमाणेच स्थायी समिती सभापतिपद अर्थातच तिजोरीच्या चाव्याही भाजपकडून बळकावण्याची चिन्हे आहेत. 

अधिक वाचा : ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी 165 दिवसांवर, रिकव्हरी रेटही 92 टक्के

महापालिकेच्या स्थायी समिती सभापति आणि चार प्रभाग समित्यांच्या सभापति पदासाठी गुरुवारी (ता. २९) निवडणूक होणार आहे. स्थायी समिती सभापतीच्या १६ सदस्यांपैकी ९ सदस्य हे भाजपचे असल्याने एकतर्फी निवडणूक होणार, असे वातावरण होते.

मात्र, भाजप नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य विजय पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपकडून जया माखिजा आणि राजू जग्यासी यांनी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी दुपारी पालिकेच्या महासभेदरम्यान भाजपचे स्थायी समिती सदस्य प्रकाश नाथानी यांनी थेट सदस्य पदाचा राजीनामा महापौर लीलाबाई आशान यांच्याकडे सोपवला. यामुळे भाजपचे संख्याबळ ७ तर शिवसेनेचे ८ झाले आहे. 

क्लिक करा : मिरा-भाईंदर पालिका प्रभाग समितीवर भाजपचे एकहाती वर्चस्व

टीओकेचे ओमी कालानी यांना सोबत घेऊन शिवसेनेने भाजपकडून महापौर पद हिसकावून घेतले आहे. आता तिजोरीच्या चाव्याही बळकावणार आहोत. ही ऑनलाइन निवडणूक असून चिठ्ठीची आवश्यकता भासणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केली. तर, ही भाजपच्या कर्माची फळे आहेत, असा टोमणा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी लगावला. 

विजय पाटील यांना आम्ही व्हिप बजावणार आहोत. त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मत न दिल्यास त्यांना अनुशासन भंगाची नोटीस देऊन नगरसेवक पद बाद करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करू.
- जमनादास पुरस्वानी, भाजप गटनेते
 

--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ulhasnagar Municipal Corporation Standing Committee election, BJP on backfoot