उल्हासनगरच्या कागदी पिशव्या सिंगापूरला

उल्हासनगरच्या कागदी पिशव्या सिंगापूरला

उल्हासनगर : एकीच्या बळाने यशाला हमखास गवसणी घातली जाते, याचा प्रत्यय उल्हासनगरातील भंगार वेचक महिलांच्या गगनभरारीने आला. वृक्ष फाऊंडेशनच्या पुढाकाराने या महिलांनी एकत्र येत साकारलेल्या कागदी पिशव्या सातासमुद्रापार म्हणजेच सिंगापूरला रवाना झाल्या आहेत. बुधवारी पहिल्या टप्प्यातील एकूण 25 टन पिशव्या रवाना झाल्या असून, 45 दिवसांनी दुसरी खेप जाणार असल्याची माहिती या कामी पुढाकार घेणाऱ्या ज्योती (वैशू) तायडे यांनी माहिती देताना सांगितले. 

2018 साली महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक, थर्माकोल, अविघटनशील वस्तूंचे वापर, उत्पादन, विक्री, हाताळणी, वाहतूक, साठवणूक यावर बंदीची अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेची अंमलबजावणी करताना उल्हासनगर पालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार यांनी सर्व दुकाने, हातगाड्या, हॉटेलवर धडक देत प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्याची मोहीम राबवली होती.

त्याचवेळी वृक्ष फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती तायडे यांनी कागदी पाऊच, पिशव्यांसाठी पुढाकार घेतला. त्यासाठी मुख्याध्यापिका तसेच टीम ओमी कालानी समुहातील नगरसेविका रेखा ठाकूर यांनी यांनी ज्योती यांना सहकार्य केले. 

ज्योती यांनी भंगार वेचणाऱ्या महिलांना एकत्र केले. त्यांच्या मदतीने कागदी पिशव्या साकारल्या जाऊ लागल्या. कल्याण, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ आदी आजूबाजूच्या शहरात या पिशव्यांना मागणी येऊ लागली. विरघळून जाणाऱ्या कागदाचा वापर करून या रिसायकल कागदी पाऊच, पिशव्या असल्याने त्यांची महिमा थेट सिंगापूरला पोहचली आणि तेथून 25 टन मालाची मागणी वृक्ष फाऊंडेशनला मिळाली. 500 भंगार वेचणाऱ्या महिलांनी अथक परिश्रम घेऊन हा माल 45 दिवसात पूर्ण केल्यावर नुकताच हा माल सिंगापूरला पाठवण्यात आला. 

500 महिलांचा हात जुटले 
ज्योती तायडे या सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी त्यांची स्वच्छ भारत अभियान अंतर्गत "स्वच्छता दूत' कमिटीवर नियुक्ती केली होती. त्यांच्या सोसायटीला पुरस्कार मिळाला होता. कागदी पिशव्या बनवण्यात पुढाकार घेतल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने ज्योती तायडे यांना "हिरकणी' पुरस्कार प्रदान केला होता. हे माझे एकटीचे काम नसून माझ्यासोबत 500 महिलांचे हात यासाठी जुटले आहेत. भंगार वेचणाऱ्या या महिलांना सन्मानाचा रोजगार मिळाला असल्याचे ज्योती तायडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com