शांतीनगर स्मशानभूमीतील अस्थी गायब ; पोलिसांना पाचारण

दिनेश गोगी
शुक्रवार, 8 जून 2018

किशनलाल सचदेव,गुल दरयानी,भगवान बालानी,रामपती शुक्ला या विविध चौघांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर 6 जूनला शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

उल्हासनगर : 3 दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या आपल्या नातलगांच्या अस्थी घेण्यासाठी नातलग गेले असता, तेथील अस्थीच गायब असल्याने नातवाईकांनी शांतीनगर स्मशानभूमीत गोंधळ घातल्याची घटना आज सकाळी उल्हासनगरात घडली. शांतता बिघडल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि नुकतेच कामाला लागलेल्या तरुणाने या अस्थी कापडात गुंडाळून ठेवल्याचे समजल्यानंतर प्रकरण शांत झाले.

किशनलाल सचदेव,गुल दरयानी,भगवान बालानी,रामपती शुक्ला या विविध चौघांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर 6 जूनला शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांचे नातलग आज तिसऱ्या दिवशी विसर्जनासाठी अस्थी घेण्यासाठी गेले असता, त्याजागी अस्थी नव्हत्या. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना अस्थीविषयी विचारणा केली असता, ते देखील याबाबत अनभिज्ञ होते. एकच गदारोळ सुरू झाल्यावर किशनलाल सचदेव यांच्या नातलगाने मध्यवर्ती पोलिस ठाण्यात फोन केल्यावर पोलिसांनी स्मशानभूमीत धाव घेतली. नातलगाचा संयम सुटत चालला होता.

शेवटी काल परवापासून कामावर येत असलेल्या तरुणाला बोलावण्यात आले. त्याने या प्रत्येकाच्या अस्थी कापडात भरून आत ठेवले होते. त्याने कापडातील अस्थी बाहेर आणल्या. मात्र, त्यापैकी आमच्या नातलगांच्या कोणत्या? हा प्रश्न पडला. शेवटी त्या उघडण्यात आल्यावर त्यातील वस्तू बघून ही अस्थी आमच्या नातलगाची खात्री पटल्यावर त्या नेण्यात आल्या. किशनलाल यांच्या अस्थीची विसर्जनापूर्वी स्मशानभूमीत पूजा करण्यात आली आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

दरम्यान, पालिकेचे याठिकाणी कार्यालय असून, तिथे लिपिक नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Ulhasnagar Shantinagar dead bones