उल्हासनगरमध्ये रिक्त इमारतीचा स्लॅब कोसळला, इमारत कोसळण्याची शक्यता

दिनेश गोगी
Sunday, 30 August 2020

आम्ही दीड वर्षांपासून बेघर आहोत, आम्हाला इमारत पुनर्बांधणीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी फ्लॅटधारक करत असून याबाबत आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती अरुण आशान यांनी दिली. 

उल्हासनगर : प्रभाग समिती 3 मध्ये दीड वर्षांपूर्वी रिकामी करण्यात आलेल्या ओम शिवगंगा को.ऑप. हौसिंग सोसायटी या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावरील दुकानावर कोसळला आहे. ही इमारत कोसळण्याची शक्‍यता असल्याने इमारतीसमोरील व्हीनस ते लालचक्की चौक हा वर्दळीचा रस्ता बंद करण्यात आला असून आजुबाजूचा परिसर देखील रिकामा करण्यात आला आहे. ही इमारत पाच मजल्यांची असून दीड वर्षांपूर्वी या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळला होता. त्यामुळे इमारतीला अतिधोकादायक घोषित करून पालिका प्रशासनाने 35 कुटुंबीयांना आणि पाच दुकानांना रिकामे करून इमारतीला सील केली होती. 

अधिक वाचाः  सुशांतच्या बँक अकाऊंटमधल्या ७० कोटींचा असा झाला व्यवहार, वाचा सविस्तर

रविवारी या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब तळ मजल्यावरील दुकानावर कोसळला. या घटनेनंतर सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके, विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, अजित साळुंके, स्थानिक नगरसेवक अरुण आशान, शेखर यादव, मिताली चानपूर, युवासेनेचे सोनू चानपूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अग्निशमनच्या जवानांनी 50 फूट परिसरातील इमारती आणि घरे रिक्त केली. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीजवळच्या विजेच्या खांबावरील वीज खंडित केली आहे.

नक्की वाचा :  काँग्रेसच्या आरोपानंतर संदीप सिंहची चौकशी होणार?, गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

आम्ही दीड वर्षांपासून बेघर आहोत, आम्हाला इमारत पुनर्बांधणीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी फ्लॅटधारक करत असून याबाबत आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती अरुण आशान यांनी दिली. 

(संपादन : वैभव गाटे)

In Ulhasnagar a slab of an empty building collapsed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ulhasnagar a slab of an empty building collapsed