काँग्रेसच्या आरोपानंतर संदीप सिंहची चौकशी होणार?, गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

पूजा विचारे
Sunday, 30 August 2020

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. अनिल देशमुख यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक बनवणारे चित्रपट निर्माते संदीप सिंगबद्दल तक्रारी आल्या आहेत.  या तक्रारी ड्रग्स कनेक्शन संबंधित आहेत.

मुंबईः  अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय तपास करत आहे. याप्रकरणी आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरु झालेत.  सुशांतसिंह प्रकरणाशी जोडला गेलेला संदीप सिंह आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात काही संबंध असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तसा आरोपही काँग्रेसनं केला आहे. या संदिप सिंहनं भाजप कार्यालयात तब्बल 53 वेळा फोन केल्याची माहिती मिळत आहे. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत.  ती खरी असल्यास भाजपा कार्यालयातील ‘तो’ बॉस कोण आणि भाजपाची संदीप सिंहशी एवढी जवळीक कशी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, अशी मागणी सचिन सावंत यांच्याकडून करण्यात आली आहे.

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 
शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक बनवणारे चित्रपट निर्माते संदीप सिंगबद्दल तक्रारी आल्या आहेत.  या तक्रारी ड्रग्स कनेक्शन संबंधित आहेत. दरम्यान सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयकडे या तक्रारी पाठवणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.

अधिक वाचाः  पालिकेकडून लता मंगेशकर यांची इमारत सील,  मंगेशकर कुटुंबियांकडून निवेदन सादर

संदीप सिंह ज्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर २७ वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट नमो बनवला. मला गेल्या दोन दिवसांपासून संदीप सिंह याचं भाजप आणि ड्रग्स कनेक्शनशी काय संबंध आहे. याविषयी चौकशी करावी, अशी मागणी मला गेल्या दोन दिवसांपासून करण्यात येत असल्याचंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. मी या तक्रारी सीबीआयकडे पाठवत आहे, जे सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे, असे देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 

काँग्रेसचा आरोप 

सुशांतच्या मृत्यू प्रकरणी ड्रग्स कनेक्शनसंदर्भात संदीप सिंह चौकशीच्या रडारवर असताना तो लंडनला पळून जाऊ शकतो असे मीडिया रिपोर्ट येत आहेत. ड्रग्स डिलींगशी संदीप सिंहचे नाव जोडले गेल्यानं भाजपशी त्याचे असलेले घनिष्ठ संबंध पाहता ड्रग्स माफियांशी भाजपचा काही संबंध आहे का, याची चौकशी झाली पाहिजे. यात सत्य समोर आल्यास भाजपला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही. संदीपनं  १ सप्टेंबर ते २३ डिसेंबर २०१९ या काळात महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात ५३ वेळा फोन केले. तो भाजप कार्यालयात कोणाशी बोलत होता? भाजपमधील संदिप सिंहचा ‘हँडलर’ कोण आहे ? असे गंभीर सवाल सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

अधिक वाचाः  मुंबईत पावसाचा जोर ओसरणार; पण ठाणे, रायगड पालघरमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज

भाजप आणि संदीप सिंह यांच्यात एवढे घनिष्ट संबंध होते की मोदींचा बायोपिक बनवण्याची जबाबदारी त्याला भाजपनं दिली. त्याच्या बदल्यात गुजरात सरकारनं त्याच्या ‘लेजंड ग्लोबल स्टूडिओ’ या कंपनीशी १७७ कोटींचा सामंजस्य करार केला. या करारासाठी फक्त संदीप सिंह याचीच कंपनी कशी काय होती? इतर फिल्म कंपन्या ‘व्हायब्रंट गुजरात’मध्ये का सामील केल्या नाहीत? , असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

अधिक वाचाः  लोकल नाहीतर मुंबईत लवकरच सुरु होणार 'ही' सेवा, वाचा सविस्तर

२०१८ मध्ये भारतीय दूतावासानं प्रायोजित केलेल्या मॉरिशस भेटीदरम्यान अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात संदिप सिंह आरोपी आहे. अशा वादग्रस्त व्यक्तीला मोदींचा बायोपिक बनवण्यासाठी भाजपने निवड करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्याला पाठिंबा कसा काय दिला? ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप आहे, अशा संदीपसिंहची गृह विभागाने कसलीही शहानिशा न करता पंतप्रधानांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी निवड केली, हे आश्चर्यकारक आहे. तसेच त्याच्या या पार्श्वभूमीची तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना माहिती कशी नव्हती? ते ‘पीएम मोदी’ या बायोपिकच्या पोस्टर अनावरणास कसे गेले? या प्रश्नांची उत्तरे भाजपला द्यावी लागतील, असंही ते म्हणालेत.

Home Minister Anil Deshmukh received complaints film maker Sandeep Singh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Anil Deshmukh received complaints film maker Sandeep Singh