प्लॅस्टिक बंदीनंतर थर्माकोल कामगारांपुढे बेरोजगारीचे डोंगर...

सुचिता करमरकर
रविवार, 1 एप्रिल 2018

थर्माकोल कलाकार संघटनेच्या ठाणे विभागाने यासंदर्भात कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली. या बंदीतून थर्माकोलला वगळावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

कल्याण - गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला. याबरोबरच थर्माकोलच्या वापरावरही बंदी घालण्यात आली. मात्र यामुळे थर्माकोलपासून सजावट करणाऱ्या कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. थर्माकोल कलाकार संघटनेच्या ठाणे विभागाने यासंदर्भात कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली. या बंदीतून थर्माकोलला वगळावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या विषयावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून काही मार्ग काढण्याचे प्रयत्न करु असे पवार यांनी सांगितले.     

थर्माकोलचा सर्वाधिक म्हणजे 90 टक्के वापर पॅकेजिंगसाठी केला जातो. अवघा दहा टक्के थर्माकोल उत्सवात सजावटीसाठी वापरण्यात येतो असे या संघटनेने म्हटले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय स्वागतार्ह असला तरीही थर्माकोल कलाकारीवर अवलंबून असलेल्या कलाकारांना न्याय देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलचा पुनर्वापर करणे शक्य आहे. याशिवाय तो कायमस्वरुपी नष्टही करता येऊ शकतो. जर शासनाने प्लॅस्टिक बंदीतून थर्माकोलला वगळले तर त्याचा पुनर्वापर आणि कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांना थर्माकोल कलाकार संघटनेने सांगितले.

जानेवारी 2018 मध्ये काढलेल्या अधिनियमामध्ये थर्माकोलचा प्लास्टिक बंदीमधे समावेश नव्हता. मात्र 23 मार्च 2018 रोजी काढलेल्या अधिनियमामध्ये थर्माकोलचा समावेश केला आहे. थर्माकोल पुनर्वापर यंत्रणा बसवून हा प्रश्न सुटू शकतो. तशा पध्दतीची यंत्रणा ठाणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बसवण्यात आली आहे. कलाकारांच्या रोजगाराचा विचार करुन थर्माकोलला बंदीमधून वगळून त्याचा इकोफ्रेंडली यादीत समावेश करावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करु असे आ. पवार यांनी सांगितले.

Web Title: Unemployment has come to the thermocol workers