
राज्यात शनिवारपर्यंतचा कोव्हिडच्या मृतांचा आकडा ५० हजारांच्या वर गेला आहे; मात्र यातील ५० टक्के मृत्यू कोव्हिडसह इतर सहव्याधी असणारे आहेत.
मुंबई : राज्यात शनिवारपर्यंतचा कोव्हिडच्या मृतांचा आकडा ५० हजारांच्या वर गेला आहे; मात्र यातील ५० टक्के मृत्यू कोव्हिडसह इतर सहव्याधी असणारे आहेत. राज्यातील १० पैकी सात जणांच्या मृत्यूंमध्ये कोव्हिडसह इतर व्याधी होत्या. त्यातीलही अर्धे मृत्यू दोन गंभीर आणि उच्च जोखीम असलेल्या आजारांमुळे झाले आहेत, असा निष्कर्ष आरोग्य विभागाने केलेल्या निरीक्षणातून समोर आला आहे.
कोव्हिडमुळे बळी पडलेल्यांपैकी ४६.७ टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाब, तर ३९.४ टक्क्यांमध्ये मधुमेह होता. उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन गंभीर आणि उच्च जोखमीचे आजार आहेत. त्यामुळे या अतिजोखमीच्या आणि गंभीर रुग्णांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे. राज्यात आतापर्यंत ५०,०२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी जास्तीत जास्त मृत्यू ६०-६९ वयोगटातील लोकांमध्ये नोंदवण्यात आले, तर प्रत्येक पाचव्या व्यक्तीचा मृत्यू पन्नाशी आणि सत्तरी पार केल्यामुळे झाला आहे. यात उच्च रक्तदाब सर्वाधिक सामान्य सहव्याधी (४६.७ टक्के) आणि दुसरा प्रमुख आजार म्हणजे मधुमेह ३९.४ टक्के आहे. प्रत्येक पाचव्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही दोन प्रमुख कारणे आहेत. फक्त ११
टक्के लोकांना हृदयविकार असल्याची नोंद आहे.
देशाच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. भारत मृत्यूंच्या तुलनेत जगात तिसऱ्या क्रमांकांवर आहे. याचा अर्थ कोव्हिडमुळे होणारा प्रत्येक तिसरा मृत्यू हा महाराष्ट्रात होत आहे.
Unmasking Happiness | डिस्चार्जनंतर घ्यावयाची काळजी आणि उपचार
कोव्हिडमुळे झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू पुरुषांचे आहेत. मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाण ६९.८ टक्के आहे. म्हणजे ३४,४९९ एवढे मृत्यू झाले आहेत. दरम्यान, ३०.२ टक्के महिलांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आधी मृत्यूंचे प्रमाण जास्त होते; मात्र गेल्या दोन महिन्यांत या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. डिसेंबरमध्ये मृत्युदर दोन टक्क्यांवर पोहोचला आहे.
- डॉ. प्रदीप आवटे,
राज्य सर्वेक्षण अधिकारी
--------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )