सायंकाळपर्यंत चर्चा पाकिटाचीच!

सायंकाळपर्यंत चर्चा पाकिटाचीच!

पनवेल, ता. २१ : ऐन दिवाळीत विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने या वेळेला पाकिटे लवकर मिळतील, या आशेत असलेल्या मतदारांचा भ्रमनिरास झाल्याचे पाहायला मिळाले. मतदानाच्या दिवशी मतदारांच्या घरापर्यंत पाकीट पोहचणार, याची मतदारांना खात्री होती; मात्र मतदानाच्या एक दिवस आधी पाकिटे न पोहचल्याने अनेकांनी सायंकाळी तसेच रात्रीच्या वेळी विविध पक्षांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. त्या त्या पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनीही पाकीट वाटपाचे काम मिळेल या अपेक्षेने रात्री उशिरापर्यंत मध्यवर्ती कार्यालयात गर्दी केल्याने अनेक ठिकाणची कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. 

दरवर्षी दिवाळीत राजकीय पक्षातर्फे मतदारांना खूश करण्याच्या उद्देशाने दिवाळीत उटण्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात येते. विधानसभा निवडणुकीकरता निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे मतदारांना आकर्षित करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवण्यावर बंदी घालण्यात आल्याने राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी उटण्याची पाकिटे वाटपाचे कार्यक्रम अद्याप स्थगित ठेवले असल्याने मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. निवडणुकीची वेळ संपत आल्यानंतरही जोपर्यंत पाकीट मिळणार नाही तोपर्यंत मतदान करणार नाही, असा पवित्रा काही मतदारांनी घेतला होता. त्यामुळे मतदानाच्या शेवटच्या काही तासात टक्केवारी वाढवण्यासाठी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी पक्षाच्या हक्काच्या काही मतदारांना ३००, ५०० तसेच १००० किलोे ग्रॅमची पाकिटे देऊन मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला, असल्याची चर्चा पनवेल परिसरात रंगली होती.

उटण्याच्या पाकिटांची खिल्ली 
उटण्याच्या पाकिटांवरील अनेक विनोद सोशल मीडियावर दिवसभर सुरू होते. दिवाळीत पाकिटाची असलेली क्रेझ पाहता सोशल मीडियावर उटण्याच्या पाकिटाबाबत अनेक विनोद पसरवून पाकिटांच्या प्रतीक्षेत असलेल्या मतदारांची खिल्ली उडविण्यात येत होती. यामध्ये ‘पाकीट आलं रे’ सुगंधी उटणे फक्त रुपये १, अशा अनेक विनोदांचा समावेश होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com