कोरोनाच्या संकट काळात बेस्ट बसनं प्रवास करताय, मग ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी

पूजा विचारे
Wednesday, 16 September 2020

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच बेस्टच्या ताफ्यात विजेवरील आठ बसगाड्यांचा समावेश होणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या बघता बेस्टनं आपल्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या ३०८ वातानुकूलित बस दाखल करणार आहे.

मुंबईः सध्या सर्वचजण कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. राज्यात अनलॉक ४ची प्रक्रिया सुरु आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा बंदच आहे. मात्र कोरोनाच्या सुरुवातीच्या  बेस्टनं अत्यावश्यक काळात आपली भूमिका बजावली. त्यात अजूनही लोकल सेवा बंद असल्यानं लोकांकडे प्रवास करण्यासाठी बेस्ट बसचा एकमेव पर्याय आहे.  बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  त्यात सद्यपरिस्थिती बेस्ट बसमध्येही गर्दीचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच बेस्टच्या ताफ्यात विजेवरील आठ बसगाड्यांचा समावेश होणार आहे. 

प्रवाशांची वाढती संख्या बघता बेस्टनं आपल्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या ३०८ वातानुकूलित बस दाखल करणार आहे. या बस भाडेतत्त्वावर असतील. त्यातील ८ बस येत्या १५ दिवसांत, त्यानंतर ३०० बस नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्यात सेवेत रुजू होती, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलीय. बेस्टच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे अपुऱ्या पडणाऱ्या बसगाड्यांमुळे प्रवाशांकडून बसेसची संख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली जातेय. 

सध्या बेस्टच्या ताफ्यात ३,५०० बस आहेत. यामध्ये बेस्टच्या स्वमालकीच्या ८९८ बसचे आयुर्मान संपत आल्याने पुढील वर्षांच्या मार्च महिन्यापर्यत त्या भंगारात काढण्यात येणारेत. त्यातच भाडेतत्त्वावरील १,२०० मिनीबसपैकी फक्त ४६० बसच ताफ्यात आल्याने बेस्टचा गाड्याचा ताफा कमी होणार आहे.

हेही वाचाः  मदन शर्मा मारहाण प्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांना होऊ शकते ७ वर्षांची शिक्षा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड देत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे बसची संख्या वाढवण्यासाठी बेस्ट प्रयत्न करत आहेत. 

गेल्या वर्षी जून महिन्यात बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी विजेवरील बस बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जातील, अशी घोषणा केली होती. त्यानुसार पहिल्यांदा ३४६ बसचे नियोजन केले गेले. आतापर्यंत केवळ ३८ बस दाखल झाल्या होत्या. यामध्ये बेस्टच्या मालकीच्या सहा विना वातानुकूलित बस आहेत. तर त्यात भाडेतत्त्वावरील वातानुकूलित ३२ मिडी बस आहेत. त्यानंतर आणखी ८ मिडी वातानुकूलित बस येत्या १५ दिवसांत दाखल होणार असून १६० मिडी आणि १४० एकमजली मोठ्या आकाराच्या बस येत्या नोव्हेंबरपासून दाखल होण्यास सुरुवात होईल.

अधिक वाचाः  महत्त्वाची बातमी : म्हाडामार्फत ठाण्यातील 567 सदनिका पोलिसांना मिळणार

तसंच या ३०० बस वातानुकूलित आणि भाडेतत्त्वावर असणार आहेत. प्रत्येक एकमजली बसची किंमत २ कोटी रुपये आणि मिडी बसची किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे. भाडेतत्त्वावरील १,२०० बसव्यतिरिक्त विजेवरील बस आल्यास बेस्टचा गाड्याचा ताफा आणखी वाढणार आहे. त्यामुळे बसची संख्या वाढल्यास प्रवाशांना प्रवास करणं आणखीन सोयीस्कर होईल.

Upcoming next 15 days BEST will have 8 electric buses


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Upcoming next 15 days BEST will have 8 electric buses