पिरकोनमध्ये भावकीमध्ये तुंबळ हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

लाथाबुक्‍क्‍यानी व मोटरसायकलच्या तीक्ष्ण व टोकदार लोखंडी चावीचे ठोके मारून डोक्‍याला गंभीर दुखापत केली आहे. या हल्ल्यात त्यांच्या पत्नीला व मुलीलाही जोरदार धक्काबुक्की करण्यात आली.

मुंबई : उरण तालुक्‍यातील पिरकोनमध्ये जमिनीच्या वादातून भावकीमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत सुभाष नारायण गावंड (वय 49) हे गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीनंतर संशयित चौघेही फरारी आहेत. चौघांवरही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्‍वर बाबूराव गावंड, दिनेश ज्ञानेश्‍वर गावंड, रवींद्र बाबूराव गावंड, सौरभ रवींद्र गावंड अशी संशयितांची नावे आहेत.

तालुक्‍यातील पिरकोन येथील भाजी विक्रेते सुभाष नारायण गावंड यांना जमीन विक्री करण्यास सहमती देत नसल्याचा राग मनात धरून जबरी मारहाण करण्यात आली. पाणदिवे येथील दत्त मंदिराजवळ अडवून त्यांचे चुलते ज्ञानेश्‍वर गावंड व त्यांचा मुलगा दिनेश गावंड, रवींद्र गावंड आणि सौरभ गावंड यांनी शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्‍क्‍यानी व मोटरसायकलच्या तीक्ष्ण व टोकदार लोखंडी चावीचे ठोके मारून डोक्‍याला गंभीर दुखापत केली आहे. या हल्ल्यात त्यांच्या पत्नीला व मुलीलाही जोरदार धक्काबुक्की करण्यात आली.

या प्रकरणी उरण पोलिस ठाण्यात सुभाष गावंड यांनी तक्रार दाखल केली आहे. पिरकोन गावातील सुभाष नारायण गावंड हे कुटुंबाची एकत्रित असलेली जमीन विकण्यास सहमती देत नव्हते. त्याचा राग मनात धरून संतोष यांचे चुलतभाऊ ज्ञानेश्‍वर बाबूराव गावंड व त्यांचा मुलगा दिनेश ज्ञानेश्‍वर गावंड व दुसरा चुलतभाऊ रवींद्र बाबूराव गावंड व त्यांचा मुलगा सौरभ रवींद्र गावंड यांनी सुभाष गावंड यांना कोप्रोली मार्गाकडे जात असल्याचे पाहून त्यांचा पाठलाग केला. त्यांना पिरकोन-कोप्रोली रस्त्यावर पाणदिवे येथील दत्त मंदिराजवळ दुपारी 4.30 च्या सुमारास गाठून शिवीगाळ व दमदाटी करीत दिनेशने सुभाष व त्यांची मुलगी बसलेल्या मोटरसायकलवर लाथ मारून दोघांनाही खाली पाडले. त्यानंतर लाथाबुक्‍क्‍याने आणि मोटरसायकलच्या लोखंडी तीक्ष्ण व टोकदार चावीचे ठोके मारल्याने डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर सुभाष यांच्या पत्नीने सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्का देऊन रस्त्यावर पाडले.

याच दरम्यान या ठिकाणी दुसऱ्या चुलतभावाचा मुलगा सौरभ रवींद्र गावंड आला. त्यानेही सुभाष गावंड यांना शिवीगाळ करीत हाताच्या अंगठ्याचा जोरदार चावा घेतल्याने गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. या चारही जणांनी संतोष यांना पोलिसांत तक्रार केल्यास तुला बघून घेऊ, अशी धमकी दिली. सुभाष गावंड यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ज्ञानेश्‍वर बाबूराव गावंड, दिनेश ज्ञानेश्‍वर गावंड, रवींद्र बाबूराव गावंड, सौरभ रवींद्र गावंड या चारही संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघ अधिक तपास करीत आहेत. चारही संशयित फरारी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: URAN ISSUE

फोटो गॅलरी