रेल्वे अपघात टाळण्यासाठी परदेशी तंत्रज्ञान वापरा! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

मुंबई - रेल्वे मार्गावरील अपघात टाळण्यासाठी रुळांवर आधुनिक परदेशी साधने बसवण्याच्या पर्यायावर विचार करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 17) रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारला केली. 

मुंबई - रेल्वे मार्गावरील अपघात टाळण्यासाठी रुळांवर आधुनिक परदेशी साधने बसवण्याच्या पर्यायावर विचार करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 17) रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारला केली. 

काही महिन्यांपूर्वी दिवा स्टेशनजवळ रुळावर लोखंडाचा तुकडा ठेवण्यात आला होता; परंतु जनशताब्दी एक्‍स्प्रेसच्या मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला होता. अपघाताला कारणीभूत ठरणारे प्रकार शोधण्यासाठी परदेशी तंत्रज्ञान वापरलेली साधने रेल्वे रुळांवर वापरता येतील का, अशी विचारणा न्यायालयाने यापूर्वी केली होती; मात्र सध्या ते अशक्‍य असल्याचे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयास सांगण्यात आले होते. 

उत्तर प्रदेशमधील दुर्घटनांनंतर तेथील "एटीएस'शी संपर्क साधून अद्ययावत यंत्रणा उभारण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे; तसेच रुळांची नियमित देखरेख करणारी पोलिस पथकेही तैनात करण्यात आली आहेत, असे रेल्वेच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. 

अवकाशात उपग्रह पाठवण्याचे तंत्रज्ञान परदेशातून आयात केले जाते. दुर्घटना टाळण्यासाठी अशा प्रकारचे दिशादर्शक तंत्रज्ञान मिळवण्यावर सरकारने भर द्यायला हवा, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. रेल्वेमार्गाभोवती कडेकोट कुंपण अथवा भिंत बांधण्याची सूचनाही न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने केली. रेल्वे सुरक्षेबाबतची जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी दाखल केली आहे. 

Web Title: Use foreign technology to prevent train accidents!