मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या ८,७१२ रुग्णांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या ८,७१२ रुग्णांचे लसीकरण

मुंबई : अंथरुणाला खिळलेल्या ८,७१२ रुग्णांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली. यातील ३,९४५ जणांना लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. अंथरुणाला खिळलेल्या (बेड रिडन) ४५ टक्के रुग्णांना कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत, तर ५४ टक्के जणांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, की अंथरणाला खिळलेल्या ४,५०० रुग्णांनी स्वतःहून लशीसाठी पालिकेकडे नोंद केली. मात्र, उर्वरितांची माहिती घेऊन पालिकेने लस देण्यास सुरुवात केली आहे. काहींना लस देण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क करण्यात आला. त्यातील काहींनी तीन दिवसांनी प्रतिसाद दिला.

‘प्रोजेक्ट मुंबई’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक शिशिर जोशी यांनी सांगितले की, पालिकेने अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना लस देण्याचे जाहीर केल्यानंतर रुग्णांना संपर्क करण्यास सुरुवात झाली. मात्र, काहींनी लशीबाबत शंका उपस्थित केल्या. काही रुग्ण झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. त्यामुळे लशींचे वाहन दारापर्यंत नेण्यास अडचणी आल्या.]

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

१४ हजार गृहसंस्थांमध्ये लसीकरण १०० टक्के पूर्ण

मुंबईतील १४ हजारांहून अधिक गृहसंस्थांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे. अशा गृहसंस्थांवर लसीकरण पूर्ण झाल्याचे फलक लावण्यात येत आहेत. कोरोना रुग्णवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जनजागृतीवर भर दिला जात असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम पुन्हा गतिमान करण्यात आली आहे. शहरात कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा १०० टक्के पूर्ण झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. शहरांत ३७ हजार गृहसंस्था आहेत. त्यापैकी २२ हजार गृहसंस्था नोंदणीकृत आहेत. त्यापैकी १४ हजार ५०० गृहसंस्थांमधील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ऑगस्टपासून निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्याच वेळी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात रुग्णसंख्येत वाढ झाली नाही. तरीही सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

loading image
go to top