'आघाडी तोडण्याबाबत ओवेसींना जाहीर करू द्या' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी युती तोडण्याच्या केलेल्या घोषणेची दखल घेतली जात नसल्याचे "वंचित'ने थेट स्पष्ट केल्याने "एमआयएम'चे राज्यातील नेतृत्व आणि वंचित आघाडीच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याचेही यामुळे चव्हाट्यावर आले. 

मुंबई : वंचित आघाडीतून "एमआयएम'बाहेर पडल्याचे वृत्त वंचित बहुजन आघाडीने फेटाळून लावत 'एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून युती तोडण्याबाबत जाहीर केले जात नाही, तोपर्यंत युती कायम असल्याची भूमिका वंचित आघाडीने घेतली आहे.

'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी युती तोडण्याच्या केलेल्या घोषणेची दखल घेतली जात नसल्याचे "वंचित'ने थेट स्पष्ट केल्याने "एमआयएम'चे राज्यातील नेतृत्व आणि वंचित आघाडीच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याचेही यामुळे चव्हाट्यावर आले. 

"एमआयएम'ने वंचितकडे 17 जागांची मागणी केली असून, त्यावर प्राथमिक चर्चा सुरू आहे. ओवेसी यांच्याकडून युती तोडल्याचे कोणतेही पत्र आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत युती कायम असल्याचे आम्ही मानतो, असे "वंचित'चे नेते रतन बनसोडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ओवेसी यांनी राज्यात युती करण्याविषयी सर्वाधिकार जलील यांना दिल्याचे समजते; तसेच "वंचित'चे नेते प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे झालेल्या चर्चेतही जागावाटपावर गाडी अडल्याची चर्चा होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aghadi statement on MIM