प्रशासनाला नाही जमले ते कोरोनाने साधले; अन् यामुळेच भिवंडीकरांची टळली 'ठाणेवारी'! 

राहुल क्षीरसागर
Thursday, 3 September 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयांचे बळकटीकरण, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे. त्याचाच फायदा भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाला (आयजीएम) झाल्याचे दिसून आले. या रुग्णालयाची गळकी छते, नादुरुस्त फर्निचर, अधूनमधून स्लॅब पडणे अशी काही परिस्थिती होती; मात्र कोरोनामुळे या रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करण्यात आले असून सेंट्रल ऑक्‍सिजनच्या सुविधेसह व्हेंटिलेटर्सदेखील उपलब्ध करण्यात आल्याने रुग्णालयाला कोरोनाच्या निमित्ताने का होईना अखेर नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा आहे. 

ठाणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयांचे बळकटीकरण, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे. त्याचाच फायदा भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाला (आयजीएम) झाल्याचे दिसून आले. या रुग्णालयाची गळकी छते, नादुरुस्त फर्निचर, अधूनमधून स्लॅब पडणे अशी काही परिस्थिती होती; मात्र कोरोनामुळे या रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करण्यात आले असून सेंट्रल ऑक्‍सिजनच्या सुविधेसह व्हेंटिलेटर्सदेखील उपलब्ध करण्यात आल्याने रुग्णालयाला कोरोनाच्या निमित्ताने का होईना अखेर नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा आहे. 

क्लिक करा : मुंबईत चाचण्या वाढवा; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अपुऱ्या खाटा, अतिदक्षता विभागाची सुविधा नसणे, यामुळे आयजीएम रुग्णालयात गंभीर आजारावर उपचारासाठी आलेल्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयाची वाट धरावी लागत होती. त्यामुळे हे रुग्णालय मरणासन्न अवस्थेत गेले होते. मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाने दस्तक दिल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर सरकारने भर दिला. त्यानुसार भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात गळक्‍या भिंतींची डागडुजी करण्यात आली असून नादुरुस्त फर्निचर काढून टाकीत त्या जागी नवीन फर्निचर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कोव्हिड रुग्णांना सर्वाधिक ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर्सची भासणारी आवश्‍यकता लक्षात घेऊन, 100 पैकी 20 बेडसचे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले आहे. त्याबरोबर 80 बेडचे सामान्य रुग्ण विभागदेखील सेंट्रल ऑक्‍सिजनने संलग्न करण्यात आले आहे. पुरेशा प्रमाणात डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे रुग्णालयाचे बळकटीकारण झाले आहे; तर लवकरच या रुग्णालयात लिक्विड ऑक्‍सिजन टाकी बसविण्यात येणार असल्यामुळे ऑक्‍सिजनअभावी होणारे मृत्यूदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. 

क्लिक करा : हुश्श...ई-पास रद्दमुळे पोलिसांवरचा ताण झाला कमी; महिन्याला तब्बल दोन लाख पास होत असे जारी 

50 बेडचे नॉनकोव्हिड विभाग 
भिवंडी तालुक्‍यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे कोव्हिड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले; मात्र सध्याच्या घडीला तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या लक्षात, घेऊन इतर आजारांच्या गोरगरीब रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालयाची व तेथील कार्यरत डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांचे विभाजन करून 50 बेडचे नॉनकोव्हिड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. यामध्ये बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग आणि प्रसूती कक्ष सुरू करण्यात आले आहे. 

भिवंडी तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी वैद्यकीय सेवा अद्ययावत करण्याची आवश्‍यकता होती. यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करण्यात आले असून त्या ठिकाणी सेन्ट्रल ऑक्‍सिजन सुविधेसह व्हेंटिलेटर्स व आता लिक्विड ऑक्‍सिजन सुविधादेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. 
- डॉ. कैलास पवार, 
जिल्हा शल्यचिकित्सक 

____________
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various facilities at Indira Gandhi Hospital in Bhiwandi due to Covid