पनवेल ते वसई लोकलसेवा लवकरच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

पनवेल ते वसई मार्गावर लोकलसेवा सुरू करण्यासाठी तब्बल 980 कोटींच्या प्रकल्पाचा प्रस्ताव मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मध्य रेल्वे प्रशासनाला सादर केला आहे

मुंबई : पनवेल ते वसई मार्गावर लोकलसेवा सुरू करण्यासाठी तब्बल 980 कोटींच्या प्रकल्पाचा प्रस्ताव मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मध्य रेल्वे प्रशासनाला सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास या मार्गावर लोकलच्या टप्प्याटप्प्याने दररोज 170 फेऱ्या होतील. त्यासाठी 11 नवी स्थानके उभारण्यात येणार आहेत. भविष्यात या लोकलसेवेचा डहाणू जंक्‍शनपर्यंतही विस्तार होण्याची शक्‍यता आहे. 

सध्या पनवेल ते वसई मार्गावर "मेनलाईन इलेक्‍ट्रिकल मल्टिपल युनिट'(मेमू) चालवली जाते. या मार्गावर मेमूच्या 32 फेऱ्या होतात. याशिवाय गुजरातवरून मध्य रेल्वेवर येणाऱ्या रेल्वेगाड्याही चालवल्या जातात. काही वर्षांपासून भिवंडी, पनवेल परिसराचा औद्योगिक व नागरी विकास झपाट्याने होत असल्याने या मार्गावर मेमूऐवजी लोकलसेवा सुरू करण्याचा विचार एमआरव्हीसीकडून 2012 पासून केला जात होता; मात्र आठवड्याभरापूर्वी याबाबतचा प्रत्यक्ष प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. 

पनवेल ते वसई या 63 किलोमीटरच्या मार्गावर लोकल चालवण्यासाठी सिग्नल यंत्रणा, फलाट यामध्ये बदल करावा लागणार आहे. त्यासोबतच 11 स्थानके नव्याने बांधण्यात येणार आहेत. यासाठी 980 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात ही सेवा थेट डहाणूपर्यंत विस्तारित करण्याचाही विचार आहे. 
---- 
ही कामे करावी लागणार 
- फलाटांची उंची व लांबी वाढवणे. 
- प्रस्तावित 11 नव्या स्थानकांसाठी जागा निश्‍चिती व बांधकाम 
- लोकलसाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा उभारणे. 

------- 
मेल-एक्‍स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका? 
लोकलसेवा सुरू करण्यापूर्वी मेल-एक्‍स्प्रेससाठी नवी मार्गिका तयार करण्याचा एमआरव्हीसीचा विचार होता. हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडेही पाठवला होता. मात्र, तो प्रस्ताव फेरविचारासाठी परत आला आहे. त्याबाबतही या प्रस्तावात नव्याने शिफारस करण्यात आली आहे. मेल-एक्‍स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका केल्यास त्याचा लोकलसेवेवर परिणाम होणार नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 
---- 
पनवेल ते वसई या मार्गावर लोकलसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गावर टप्प्याटप्प्याने लोकलच्या दररोज 170 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. 
- आर. एस. खुराणा, महाव्यवस्थापक, एमआरव्हीसी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vasai panvel local soon