वसई-विरारपाठोपाठ मीरा-भाईंदरमध्येही; परिवहनसेवेचे कंत्राट रद्द करणार?

संदीप पंडित
Thursday, 10 September 2020

मिरा भाईंदर शहरातील लॉकडाऊन उघडण्यात आल्यानंतर परिवहन सेवा तात्काळ सुरु करण्याबाबत देण्यात आलेला आदेश धुडकावून लावणाऱ्या भगीरथी ट्रान्सकॉर्पोरेशन या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याबाबत महापालिका पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

भाईंदर  ः मिरा भाईंदर शहरातील लॉकडाऊन उघडण्यात आल्यानंतर परिवहन सेवा तात्काळ सुरु करण्याबाबत देण्यात आलेला आदेश धुडकावून लावणाऱ्या भगीरथी ट्रान्सकॉर्पोरेशन या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याबाबत महापालिका पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. नागरिकांचे हित लक्षात घेता महानगरपालिका आता स्वत: परिवहन सेवा चालविणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. वसई विरार पालिकेपाठोपाठ मीरा भाईंदरमध्येही कंत्राट रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 

मुंबई विद्यापीठाकडून अंतिम वर्षाचे वेळापत्रक जाहीर; 1 ते 17 ऑक्टोबरदरम्यान परीक्षा; जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप

मिरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवेचे कंत्राट भगीरथी ट्रान्सकॉर्पोरेशन या कंपनीस ऑगस्ट 2019 पासून देण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून केवळ पालिका कर्मचाऱ्यांकरिता सेवा सुरु ठेवण्यात आलेली होती. लॉकडाऊननंतर परिवहनसेवा नियमित  सुरु करण्याबाबतचे आदेश आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी कंपनीला दिले होते. मात्र, हा आदेश धुडकावून लावत या कंपनीने प्रशासनाकडे चढ्यादराने थकबाकीची तसेच किलोमीटरच्या दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून आपले मासिक वेतन मिळालेले नाही. त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले होते. त्यापार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांकडून परिवहन सेवेचे कंत्राट रद्द करून पालिका स्वतः बस चालवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई सुडबुद्धीने! आशिष शेलार यांची पालिका, राज्य सरकारवर टीका

कंपनी काळ्या यादीत
परिवहन सेवा बंद असल्याने रिक्षा चालकांकडून मनमानी पध्दतीने प्रवाशांची आर्थिक लूट सुरु झाली आहे. सदरहू बाब गंभीर असल्याने आयुक्तांचा आदेश डावलणाऱ्या या ठेकेदाराविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अपक्ष आमदार गीता जैन यांनी आयुक्तांकडे केली आहे. या मागणीची दखल घेत आयुक्तांनी आता भागीरथी ट्रान्स कॉर्पोरेशन या कंपनीला काळया यादीत टाकण्याची कारवाई करण्याची सूचना विधी विभागाला दिली असून या संदर्भात लवकरच या कंपनील नोटीस बजावण्यात येणार आहे.

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasai-Virar followed by Mira-Bhayander; Cancel transport service contract?