वसई-विरार महानगरपालिकेचा 105 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

विरार : वसई-विरार महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती नितीन राऊत यांनी शुक्रवारी (ता. 17) 105 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. महापालिकेचे अंदाजपत्रक 1867 कोटींचे असून, या वेळच्या अर्थसंकल्पात कोणताही कर वाढविण्यात आलेला नसल्याने करदात्यांना दिलासा मिळाला आहे. 

विरार : वसई-विरार महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती नितीन राऊत यांनी शुक्रवारी (ता. 17) 105 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. महापालिकेचे अंदाजपत्रक 1867 कोटींचे असून, या वेळच्या अर्थसंकल्पात कोणताही कर वाढविण्यात आलेला नसल्याने करदात्यांना दिलासा मिळाला आहे. 

वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 27 फेब्रुवारी 2017 रोजी स्थायी समितीला 1086 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात सुधार करून स्थायी समितीने 1867 अर्थसंकल्प सभागृहाला सादर केला. हा अर्थसंकल्प 105 कोटी शिलकीचा आहे. यामध्ये स्थायीने अनेक विकास योजनांचा समावेश केला आहे. भुयारी गटार योजना, तलाव सुशोभीकरण, मार्केट, हॉस्पिटल अशा अनेक नवीन योजनांचा समावेश; अंध, अपंगांसाठी योजना, आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. 

रुग्णांना मोफत भोजन व अल्पोपहार, आवास योजनेसाठी 2 कोटी रुपयांची तरतूद, पाणीपुरवठा योजनेसाठी भक्कम तरतूद करण्यात आली आहे. नाट्यगृह, पालिकेतील विविध इमारती, स्मशानभूमी, रात्र निवारा केंद्र, पे ऍण्ड पार्क, शौचालय, क्रीडा संकुलाचा विकास यांचा समावेश, तर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत यात 5 वर्ष आगाऊ कर भरणाऱ्यांना 15 टक्के सूट, स्वातंत्र्य सैनिकाच्या एका अपत्याला 100 टक्के सूट, पाण्याचा रेन हार्वेस्टिंग पुनर्वापर करणाऱ्या सोसायट्यांना पाणीपट्टी देयकात 2 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

अंध-अपंग मुलींच्या विवाहासाठी 25 लाखांची तरतूद; गतिमंद, मतिमंद बालकांसाठी 70 लाखांची तरतूद, विद्यार्थ्यांसाठी मोफत बस पास योजना, महिलांना डायलेसिससाठी 50 लाखांची तरतूद, आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना खासगी विहीर खोदण्यासाठी 15 लाखांची, तर शेतकऱ्यांसाठी कृषी साहित्य, वीज पंप, फवारणी पंप, जंतुनाशके बियाणे, खत आदींकरता 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मच्छीमार व बोटींवरील मजुरांसाठी कल्याणकारी योजनेंतर्गत 2 कोटी, आंतरशालेय कला-क्रीडा महोत्सवासाठी 12 लाख, खेळ व संघ दत्तक घेणे, यांसह विविध स्पर्धांसाठी 1 कोटी, महापौर सहायता निधी 25 लाख, रोपवाटिकेसाठी 17 कोटी 31 लाख आणि पाणी योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

हा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती नितीन राऊत यांनी महापौर प्रविणा ठाकूर यांना सादर केला. या वेळी उपमहापौर उमेश नाईक व आयुक्त सतीश लोखंडे उपस्थित होते. 

Web Title: Vasai Virar Municipal corporation budget 2017