विरार - राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यातच गेल्या पाच वर्षापासून लोकप्रतिनिधी विना असलेल्या वसई विरार महानगरपालिकेचीही निवडणूक अखेर होणार आहे. या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात येणार आहे..वसई विरार महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकप्रतिनिधीविना ५ वर्षे प्रशासकाने पालिका चालवली आहे. २०२२ ला या महापालिकेची प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यात १२६ सदस्य असणार होते. आणि ३ सदस्यांचा एक प्रभाग असे ४२ प्रभाग तयार करण्यात आले होते..परंतु सुरुवातीला कोरोनामुळे आणि नंतर ओबीसीमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता नवीन प्रभाग रचना करण्यात येणार असल्याने पूर्वी केलेल्या प्रभाग रचनेवरील खर्च मात्र वाया गेल्याचे बोलले जात आहे. नव्याने २९ प्रभाग होणार असून ४ चे २८ आणि ३ सदस्यांचा एक असे २९ प्रभाग असणार आहेत..'क' वर्ग वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक २०१५ साली एक सदस्यीय प्रभागाद्वारे झाली होती. त्यावेळी पालिकेत ११५ नगरसेवक होते. २८ जून २०२० ला या पालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत संपली होती. परंतु त्या काळात कोरोनामुळे निवडणुका ६ महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या ३ वेळा पुढे ढकलल्या गेल्या..दरम्यानच्या काळात ओबीसीवरून पुन्हा निवडणुका रखडल्या गेल्या. त्या सलग पाच वर्षापर्यंत २०२२ ला पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यात १२६ सदस्य आणि ३ चे ४२ प्रभाग बनविण्यात आले होते. त्याच प्रमाणे प्रभागाची आरक्षणे हि टाकण्यात आली होती. त्यात महापौरांसाठीचे आरक्षण हे राखीव महिलासाठी होते..परंतु त्याच दम्यान ओबीसींचा मुद्दा तापला आणि प्रकरण न्यायालयात गेल्याने पुम्हा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे १० वर्षानंतर आता निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत. २०२२ ला केलेल्या प्रभाग रचना त्यावेळी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली होती.परंतु ओबीसींच्या मुद्द्यामुळे त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याने आता पुन्हा एकदा २०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करण्यात येणार आहे. २०११ ला वसई विरारच्या लोकसंख्या १२ लाख ३४ हजार ६९० इतकी होती. १४ वर्षानंतर त्या लोकसंख्येत दुप्पट वाढ झाली असली तरी जुन्याच लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करण्यात येणार आहे..यावेळी सदस्य संख्या हि २०१५ मध्ये असलेली ११५ इतकीच राहणार आहे. परंतु प्रभाग संख्या मात्र २९ असणार आहे. यात ४ सदस्यांचे २८ प्रभाग असणार आहेत, तर एक प्रभाग हा ३ सदस्याचा असणार आहे.वसई विरारमध्ये भाजपने ३ हि जागा जिंकल्याने येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेच्या स्थापनेपासून सत्तेवर असलेल्या बहुजन विकास आघाडीला मात्र निवडणुकीत मेहनत करावी लागणार आहे. २०१५ ला महापालिकेत बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी १०८ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. परंतु यावेळी मात्र त्यांना महायुतीचा सामना करावा लागणार आहे..महायुतीत भाजप हा मोठा भाऊ असल्याने एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप किती जागा सोडते, यावर निवडणुकीची गणिते ठरणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडी एकला चलोचा मार्ग अवलंबिणार कि महाविकास आघाडी बरोबर हातमिळवणी करणार यावर सत्तेची गणिते ठरणार आहेत..२०२१ ला जनगणना होणे अपेक्षित होते. परंतु ती झाली नसल्याने २०११ च्या जनगणनेनुसार येणारी निवडणूक होणार आहे. त्यामुळे वाढलेल्या लोक्संख्येमुळे प्रभाग मोठे होण्याची श्यक्यता वर्तविण्यात येत आहे.आता नव्याने प्रभाग रचना होणार असल्याने आरक्षणे हि बदलली जाणार आहेत. त्यामुळे २०२२ ला महापौर पदाचे आरक्षण आरक्षित महिलेसाठी होते. तेही बदलले जाणार असे बोलले जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.