मटार, फ्लॉवर, भेंडी, आल्याचे दर चढेच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

गेल्या आठवड्यात भाज्यांची आवक वाढल्याने दरांमध्ये बऱ्यापैकी घसरण झाली होती; मात्र मागील २ दिवसांपासून  मटार, फ्लॉवर, भेंडीमध्ये किलोमागे १० रुपयांची दरवाढ झाली असून, आले १२० रुपये किलोने विकले जात आहे. 

नवी मुंबई : गेल्या आठवड्यात भाज्यांची आवक वाढल्याने दरांमध्ये बऱ्यापैकी घसरण झाली होती; मात्र मागील २ दिवसांपासून  मटार, फ्लॉवर, भेंडीमध्ये किलोमागे १० रुपयांची दरवाढ झाली असून, आले १२० रुपये किलोने विकले जात आहे. 

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आवक वाढल्याने फळभाज्यांच्या दरात चांगलीच घसरण झाली होती. त्यांनतर दुसऱ्या आठवड्यापासून भाज्यांच्या दरात २ ते ३ टक्‍क्‍यांनी वाढ झाली. सध्या गवार, घेवडा अशा फळभाज्यांचे दर स्थिर असले, तरी आवक घटल्याने फ्लॉवर, भेंडीचे दर वधारले आहेत. घाऊक बाजारात फ्लॉवर ३० रुपये किलोने उपलब्ध असला तरी किरकोळ विक्रेत्यांकडे ९० रुपये किलोने फ्लॉवरची विक्री होत आहे. आले १०० रुपयांवरून १२० रुपये किलोवर पोहोचले आहेत.

याबाबत किरकोळ विक्रेत्या आरती कांबळे यांनी सांगितले की, फ्लॉवरची एक गोणी २ हजार रुपयांपर्यंत येते. एका गोणीत जवळपास ५० किलो फ्लॉवर असतो. त्यातही पानेच जास्त येतात. पावसाच्या दिवसांत एखादा दिवस गोणी राहिलीच तर लगेच फ्लॉवरमध्ये कीड पडते. त्यामुळे या दिवसांत फ्लॉवरला म्हणावी तशी चांगली मागणी नसते. पितृपक्षामुळे विविध भाज्यांना मागणी असली तरी त्याचा फारसा परिणाम विक्रीवर जाणवत नसल्याचेही कांबळे यांनी नमूद केले. भोपळ्याला सध्या चांगली मागणी असून पालेभाज्यांमध्ये मेथीची चांगली विक्री होत आहे. 

घाऊक बाजारात कांदापात १५ रुपये, कोथिंबीर ४० रुपये, मेथी २५ रुपये, मुळा ३० रुपये, पालक ७ रुपये, शेपू १८ रुपयांना उपलब्ध आहे. हिरव्या मिरचीची आवक वाढल्याने ती ७ ते १० रुपये किलोने उपलब्ध आहे. किरकोळ बाजारात भेंडीचे दर गेल्या आठवड्यात साधारण ६० ते ७० रुपये किलो होते. ते आता ८० रुपये किलो झाले आहेत. मटार (वाटाणा) १२० रुपये किलोने विकला जात आहे. पालेभाज्यांमध्ये मेथीची जुडी दोन दिवसांपूर्वी १५ रुपयांना विकली जात होती. ती आता ३० रुपयांवर आली आहे. पालकचे दर १० रुपयांवरून १५ ते २० रुपयांवर; तर शेपूही २५ रुपयांवर पोहोचल्याची माहिती नेरूळ येथील किरकोळ विक्रेत्याने दिली.

पितृपक्षामुळे विविध भाज्यांना मागणी असली, तरी त्याचा फारसा परिणाम विक्रीवर जाणवत नाही. भोपळ्याला सध्या चांगली मागणी असून, पालेभाज्यांमध्ये मेथीची चांगली विक्री होत आहे.
- आरती कांबळे, किरकोळ विक्रेत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable prices go up