श्रावण मासातही भाजीपाल्याचे दर चढेच; महागाईने मुंबईकर त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

पावसामुळे उत्पादन घटल्याचा परिणाम; दर आणखा भडकण्याची शक्‍यता

ठाणे : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा परिणाम नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे श्रावण प्रारंभीच भाजीपाल्याच्या दरांनी मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. शुक्रवार (ता. 2)पासून व्रतवैकल्याच्या श्रावण महिन्यास सुरुवात झाली असून या काळात भाजीपाल्याची मागणी वाढून दरांत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

गेल्या दोन आठवड्यांत कोबी, फ्लॉवर, सुरण, सिमला मिर्ची अशा भाज्यांच्या घाऊक बाजारांतील दरांत किलोमागे 8 ते 12 रुपयांची वाढ झाली आहे, तर किरकोळ बाजारात या भाज्या आधीच्या तुलनेत 10-20 रुपये चढ्या दराने विकल्या जात आहेत. टोमॅटोच्या दरातही घाऊक बाजारात प्रति किलो 10 ते 20 रुपये, तर किरकोळ बाजारात एरवी 40 रुपये किलोने मिळणाऱ्या टोमॅटोसाठी 80 रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट पुरते कोलमडल्याचे समोर आले आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात प्रामुख्याने नाशिक आणि पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होते. गत आठवड्यापासून पावसाने झोडपल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला पिकवणाऱ्या ग्रामीण भागातील काही रस्त्यांचीही मोठी दुर्दशा झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील काही रस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

याचा परिणाम भाजीपाल्याच्या वाहतुकीवर झाल्याने गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कल्याण आणि वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक येथून येणाऱ्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने तेथूनही येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटल्याचे वाशी आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

वाहनांची संख्या 500 वरून 100 वर
दररोज वाशी आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या पाचशे गाड्या येतात. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून हे प्रमाण 100 ते 150 गाड्यांनी कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सर्वच प्रमुख भाज्यांचे दरही वाढू लागले आहेत. 

गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसामुळे राज्यातील भाजीपाला पिकवणाऱ्या जिल्ह्यांतून होणारी आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भाज्या महागल्या असून येत्या काळात सर्व भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 
- रवी कुर्डेकर, किरकोळ भाजी विक्रेते, नौपाडा, ठाणे 

भाजी         घाऊक  दर    किरकोळ  दर
भेंडी              34              60 
फरसबी         55             100
फ्लॉवर          22              60 
टोमॅटो           44               80
ढोबळी मिर्ची   32              60


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable prices rise even in Shravan month