कळव्यात मलमूत्रच्या आधारे पिकविला जातो भाजीपाला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

सार्वजनिक स्वच्छतागृह व मुताऱ्यांच्या गटारात सोडलेल्या मलमूत्रावर तांबडा माठ, वांगी, मेथी, पालक या सारखा भाजीपाला पिकविला जात आहे.

कळवा : गेल्या काही वर्षांत कळवा, ठाणे, मुंबई येथील रेल्वे रूळालगत असणाऱ्या गटारातील सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जात असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या आणि वाचल्याही असतील, परंतु कळवा, खारीगाव व ठाण्यातील महिलांनो भाजी खरेदी करताना जरा सावधान...मानवी मनाला चीड व संताप आणणारी आणि कळव्यातील लोकांच्या आरोग्याशी खेळणारी भाजीपाला पिकविण्याची 'क्लुप्ती' ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कारण काहीजण चक्क सार्वजनिक स्वच्छतागृह व मुताऱ्यांच्या गटारात सोडलेल्या मलमूत्रावर तांबडा माठ, वांगी, मेथी, पालक या सारखा भाजीपाला पिकविला जात आहे. कळवा मनसे जनहित कक्षाचे कार्यकर्ते राकेश पेडणेकर, सुशांत सूर्यराव, संजोग शीळकर यांच्या गटाने या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश शनिवार (दि. 8) ला केला.

गांधी नगर रेल्वेच्या फाटकाजवळ ठाणे महापालिकेने सार्वजनिक स्वच्छता गृह व मुतारी बांधली आहे. यातील मलमूत्राचे पाणी नळावाटे रेल्वे पटरीनजीक गटारात सोडले जाते. काही महाभागानी याचा वापर करून भाजीपाला पिकवत असून कळवा बाजारात कमी भावात विकला जात आहे. या भाजीपाल्यात अतिशय घातक जीवाणू व विषाणू असून भाज्या निकृष्ट व बेचव आहेत, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. या भाजीपाल्यामुळे कॅन्सरसारख्या घातक आजाराची लागण होऊ शकते. तसेच पावसाळ्याच्या तोंडावर अनेक साथीचे आजार जडू शकतात.

'ग्रो मोर फूड'या संकल्पनेनुसार रेल्वे प्रशासन आवारात कोणी कर्मचारी नाल्याचे, गटाराचे दूषित पाणी वापरत असेल, तर त्याचा तात्काळ परवाना रद्द करण्यात यावा, असा कोर्टाच्या निर्णय आहे. मात्र, रेल्वे परिसरात प्रदूषित भाजीपाला पिकविला जात असल्याने त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. दररोज बाजारात खरेदी-विक्रीसाठी दाखल होत असलेल्या दुषित भाज्यांमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी महापालिका व रेल्वे प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. 

"या संदर्भात आम्ही वारंवार तक्रार करून ही रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने आम्ही समाज माध्यमातर्फे आरोग्य मंत्री, रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री यांना ट्विट करून लोकांचे आरोग्य वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे."
- राकेश पेडणेकर, समाज सेवक, कळवा

"नित्कृष्ट व प्रदूषित भाज्या खाणे शरीराला अपायकारक असून त्यातून लहान मुले व महिलांच्या आरोग्यासाठी घातक आहेत." 
- डॉ. देवानंद पाटील, कळवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetables are grown on the basis of excretion