प्रभादेवीत भिंत कोसळून वाहनांचे नुकसान 

प्रभादेवीत भिंत कोसळून वाहनांचे नुकसान 

मुंबई : मुंबई महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून जाहीर करूनही प्रभादेवीतील हातिसकर वाडीलगतची संरक्षक भिंत शनिवारी (ता. 11) दुपारी कोसळली. त्यामुळे बाजूच्या आदीश सोसायटीतील तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत जीवतहानी झाली नाही. 

हातिसकर वाडीच्या पुनर्विकासाचे काम सुमारे 10 वर्षांपूर्वी सुरू झाले होते. अर्धी इमारत तयार झाल्यावर बांधकाम थांबले; त्यालाही आता अनेक वर्षे झाली आहेत. यादरम्यान बांधण्यात आलेल्या संक्रमण शिबिराचीही मुदत संपली आहे. ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस महापालिकेने मागील वर्षी दिली होती. 

जीर्ण झालेल्या संक्रमण शिबिरातील खिडक्‍यांच्या काचा लगतच्या आदीश इमारतीमधील रहिवाशांच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर पडत असतात. त्याबाबत वारंवार सूचना करूनही हातिसकर वाडीच्या पुनर्विकासकांनी दखल घेतली नाही, असा आरोप केला जातो. सांडपाणी आणि अस्वच्छतेमुळे पाया खचलेली भिंत शनिवारी कोसळली. 
या दुर्घटनेत भिंतीलगत उभ्या केलेल्या काही गाड्यांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे वाहने उभी नसल्यास तेथे लहान मुले खेळत असतात. भिंत कोसळली त्या वेळी तेथे वाहने उभी असल्याने मुले खेळत नव्हती; त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. 

राडारोडा जागेवरच 
भिंत कोसळल्यानंतर आदीश इमारतीमधील रहिवाशांनी लगेच अग्निशमन दल, दादर पोलिस आणि महापालिकेला कळवले. स्थानिक नगरसेवक हेमांगी वरळीकर घटनास्थळी आल्या. नुकसान झालेल्या गाड्या हलवल्यानंतर उर्वरित भिंत पाडण्यात आली; मात्र राडारोडा तेथेच टाकण्यात आला. त्याकडे महापालिकेच्या जी-साऊथ विभागाचे कनिष्ठ अभियंता सोनावणे यांचे लक्ष वेधले. "वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून सांगा' असे उत्तर त्यांनी दिले. जाण्या-येण्याच्या रस्त्यावरच राडारोडा पडल्याने गैरसोय होत असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. 

कायमस्वरूपी उपाय हवा 
संक्रमण शिबिराचा नाहक त्रास होत असल्याची तक्रार आदीश सोसायटीतील रहिवासी करतात. या जीर्ण झालेल्या इमारतीचा एखादा भाग किंवा लगतच्या अर्धवट बांधलेल्या इमारतीचा भाग पडून जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे कायमस्वरूपी उपाय करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com