आरटीओचा "बारामती पॅटर्न' राज्यभरात राबवण्यात खीळ? 

आरटीओचा "बारामती पॅटर्न' राज्यभरात राबवण्यात खीळ? 

मुंबई : वाहनचालक परवाना देण्याच्या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी पुणे आणि बारामती प्रादेशिक परिवहन विभागांमध्ये (आरटीओ) सेन्सर म्हणजे संवेदक असलेले संगणकीकृत ट्रॅक तयार करण्यात आले आहेत; परंतु वर्षभरापासून बारामती येथील सेन्सर ट्रॅक देखभालीअभावी बंद आहे. त्यामुळे राज्यभरात "बारामती पॅटर्न' राबवण्याच्या आरटीओच्या हेतूला खीळ बसली आहे. 

वाहनचालक परवाना मिळवण्यासाठी उमेदवाराला वाहन चालवून चाचणी द्यावी लागते. त्यावेळी परिवहन अधिकारी एका जागी बसून वाहनाचे निरीक्षण करतो. चाचणीदरम्यान वाहनात उमेदवारासोबत ड्रायव्हिंग स्कूलचा चालकही असतो. अनेकदा उमेदवाराऐवजी तोच वाहन नियंत्रित करत असल्याचे आढळते. हा प्रकार टाळण्यासाठी आणि योग्य पद्धतीने वाहनचालक परवाना देण्यासाठी प्रशिक्षण व संशोधन संस्थेने (आयडीटीआर) संगणकीकृत ट्रॅक तयार केले. या प्रणालीत वाहनचालकाची लहानशी चूकही नोंदवली जाते. चाचणीचा निकाल संगणकीकृत असतो. 

पुणे आणि बारामती प्रादेशिक परिवहन विभागांनी 2017 मध्ये असे संगणकीकृत सेन्सर बसवलेले ट्रॅक सुरू केले. बारामती येथील सेन्सर ट्रॅकच्या दुरुस्ती-देखभालीसाठी एका खासगी कंपनीला दिलेले कंत्राट वर्षभरापूर्वीच संपले; परंतु परिवहन विभागाने अद्याप या कंत्राटाचे नूतनीकरण केलेले नाही, अथवा नवा कंत्राटदारही नियुक्त केलेला नाही. त्यामुळे बारामतीचा ट्रॅक वर्षभरापासून बंद आहे. पुण्यातील सेन्सरयुक्त टेस्टिंग ट्रॅक योग्यप्रकारे सुरू असल्याने वाहनचालकांची चाचणी आणि परवाना वितरणाचे काम काटेकोरपणे होत आहे. 

अशी होते संगणकीकृत चाचणी 
परिवहन विभागातर्फे वाहनचालकाची चढ-उतार, वळण, इंग्रजी आठ आकडा, रिव्हर्स, पार्किंग अशी चाचणी घेतली जाते. या चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतरच वाहनचालक परवाना दिला जातो. त्यासाठी टेस्टिंग ट्रॅकच्या कडेला संवेदक (सेन्सर) बसवण्यात आला आहे. एका खोलीत बसलेले मोटार वाहन निरीक्षक संगणकाच्या स्क्रीनवर त्याचे त्याचे निरीक्षण करतो. चाचणी पूर्ण झाल्यानंतर संगणकीकृत अहवाल मिळतो. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता आली आहे

बारामती येथील टेस्टिंग ट्रॅकवरील सेन्सरच्या देखभाल-दुरुस्ती कंत्राटाचे नूतनीकरण लवकरच करण्यात येईल. कंत्राट संपल्याने सध्या बारामतीमधील सेवा बंद आहे. अशीच सेन्सर प्रणाली राज्यात अन्यत्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 
- शेखर चन्ने, राज्य परिवहन आयुक्त. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com