डोंबिवलीकरांनी हॉर्न न वाजविता चालवली वाहने 

डोंबिवलीकरांनी हॉर्न न वाजविता चालवली वाहने 

ठाणे : ध्वनिप्रदूषण ही प्रत्येक शहराला जडलेली एक बाधा आहे. वाहनांचे कर्ण कर्कश आवाज हा त्या प्रदूषणाचाच एक भाग. याच ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी डोंबिवलीकर एकवटले असून रविवारी प्रजासत्ताक दिनी डोंबिवलीत "नो हॉर्न डे' उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून सकाळी 9 वाजता शहरात "बाईक रॅली' काढण्यात आली होती. या रॅलीत सहभागी बाईकस्वारांनी हॉर्न न वाजविता आपला प्रवास पूर्ण केला. अशा पद्धतीने वाहन चालविणे म्हणजे स्वतःलाच एक चॅलेंज असल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रॅलीत सहभागी वाहनचालकांनी व्यक्त केली. 

पै फ्रेण्ड्‌स लायब्ररीच्यावतीने हा उपक्रम रविवारी शहरात राबविण्यात आला. या उपक्रमात दक्ष नागरिक मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रिक्षा चालक मालक संघटना, शालेय विद्यार्थी यांचाही सहभाग लाभला. सकाळी 9 वाजता टिळकनगर शाळेजवळून बाईक रॅली काढण्यात आली.

शहरात बाईक रॅली म्हटले की मोठ्याने आवाज करत जाणारी वाहने असेच चित्र चटकन डोळ्यासमोर येते. परंतु ही रॅली पाहून अनेकांच्या माना वारंवार फिरत होत्या. एकदाही हॉर्न न वाजविता दुचाकीस्वार वाहनकोंडीतून आपला रस्ता काढीत होते. चार रस्ता, मानपाडा रोड, शिव मंदिर चौक, आरटीओ कार्यालय, इंदिरा गांधी चौक, फडके रोड, गणपती मंदिर, गुप्ते रोड, गोपी मॉल, महात्मा फुले रोड, सारस्वत कॉलनी, घरडा सर्कल आदी परिसरात ही रॅली फिरवण्यात आली. 

यावेळी स्वतःचे कौशल्य वापरा, हॉर्न वाजवू नका, हॉर्न शिवाय एक दिवस, धोक्‍या शिवाय हॉर्न वाजवू नका असे संदेश हातात घेतलेले फलक या दुचाकीस्वारांच्या हातात होते. रस्त्याने विनाकारण कोणी वाहनचालक हॉर्न वाजवित असेल तर त्यांना ते हॉर्न वाजवू नका, असा सल्ला देत होते.

वाहतूक नियंत्रण विभागानेही यात सहभागी होत रिक्षाचालकांना "हॉर्न नको' असा संदेश असलेले स्टिकर वाटप केले. जेणेकरून शहरातील सर्वच रिक्षा चालकांना सातत्याने याची जाणीव होत राहील. शहरातील शालेय विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली, ते आपल्या पालकांना याविषयी माहिती देतील जेणेकरून घरोघरी हा संदेश जाईल, असे पुंडलिक पै यांनी सांगितले. 

इंदिरा चौकात सतत हॉर्नचे आवाज येत असतात. याच भागात रुग्णालये, कार्यालय, दुकान, महापालिका कार्यालय आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले, सतत हॉर्नचा आवाज आमच्या कानी पडत असतो.

सकाळ-संध्याकाळ जास्त आवाज असतो, या वेळेत आम्हाला एकमेकांशी बोलताना एकमेकांचा आवाजही येत नाही. मोठ्याने ओरडून बोलावे लागते. हॉर्नच्या आवाजाची मर्यादा आखून दिली पाहिजे जेणेकरून या त्रासातून सर्वांचीच सुटका होईल. 

डोंबिवलीकरांनी उचलला विडा... 
विनाकारण हॉर्न न वाजविता दुचाकी चालविणे म्हणजे स्वतःलाच एक आव्हान असल्यासारखे वाटत आहे. वाहन चालविताना स्वतःचे पूर्ण लक्ष वाहन व इतर वाहतुकीवर केंद्रीत करावे लागत असल्याचे मत यावेळी सहभागी वाहन चालकांनी व्यक्त केले. तसेच गरज असल्यासच यापुढे हॉर्नचा वापर करू. हळूहळू आपल्याला सवय होऊन जाईल अशा वाहतुकीची. एकापासून सुरुवात झाल्यावर इतरही आपोआप त्याचे अनुकरण करतील. डोंबिवलीकरांनी हा विडा उचलला असून आता तो कायम आमलात आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मत नागरिकांनी "सकाळ'कडे व्यक्त केले. 

"ती' सवय सुटायला दोन महिने लागले 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मिहीर देसाई म्हणाले, मी एकदा फ्रान्समध्ये गेलो होतो. तेथील नागरिकाने मला सांगितले की तुमच्या भारतात किती वाहन कोंडी असते व सातत्याने हॉर्न वाजविले जातात. मलाही त्याची सवय झाली होती. मी फ्रान्समध्ये पुन्हा परतल्यावर ती सवय सुटायला मला दोन महिने कालावधी लागला. यावरूनच आपल्या देशातील व बाहेरच्या देशातील वाहतूक व्यवस्थेतील फरक लक्षात येतो. आपणही विनाकारण हॉर्न न वाजविण्याची सवय अंगीकारली पाहिजे, त्याची सुरुवात आम्ही आजपासून स्वतःपासून करीत आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com