Vidhan Sabha 2019 : नवी मुंबईत मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

ऐरोली-बेलापूरमध्ये सरासरी 50 टक्के मतदान ; स्थलांतराचा फटका 

नवी मुंबई, ता. 21 : विधानसभा मतदार संघांकरीता दरवेळेप्रमाणे यंदाच्या मतदान प्रक्रीयेतही मतदारराजाचा निरुत्साह लाभला. पावसाचे सावट असल्याने असेही मतदान कमी होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. परंतू वरूणराजाने कडकडीत बंद पाळल्यानंतरही मतदान केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात मतदार फिरकले नाही. त्यामुळे ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदार संघात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. 2014च्या निवडणूकी एवढेच मतदान झाल्याने पुन्हा एकदा प्रस्थापितांनाच संधी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

ऐरोली आणि बेलापूरमधील 826 मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात शांततेत मतदान संपन्न झाले. अनेक मतदान केंद्रांबाहेर शंभर मीटरच्या अंतरावर खाजगी वाहने पोलिसांकडून आडवण्यात येत होती. मात्र तरी सुद्ध मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने लढवलेल्या वेग-वेगळ्या क्‍लुप्त्याही निष्फळ ठरल्या. दोन्ही मतदार संघात संध्याकाळपर्यंत सरासरी 50 टक्के एवढी मतदानाची नोंद झाली.

सकाळ पासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागायच्या ते दृश्‍य यावेळच्या निवडणूकीत फार तुरळक ठिकाणी दिसत होते. दिघा, चिंचपाडा, गणेशनगर, गणपतीपाडा, तुर्भे स्टोअर्स आणि तुर्भे नाका या भागातील झोपडपट्टी विभागात सकाळी रांगा लागण्याचे वातावरण यावेळच्या निवडणूकीत दिसले नाही. गावठाणातही यंदाच्या वर्षी मतदारांमध्ये निरुत्साह जाणवला. मात्र शहरी भागातील मतदारांनी चांगले मतदान केले.

सकाळी अनेक नवमतदारांनी आणि कार्यालयात जाणाऱ्यांनी आधी मतदान करून हक्क बजावला. अपंग आणि ज्येष्ठ नागरीकांना रांगेत उभे न करता थेट मतदानाचा लाभ निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला. अपंगांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपलब्ध केलेल्या अटो रिक्षांचा अनेक अपंगांनी लाभ घेतला. काही ठिकाणी निवडणूक आयोगाने लावलेल्या सेल्फी पॉईंटचा मतदानानंतरची सेल्फी काढण्याचा पुरेपुर अनेकांनी वापर केला. ऐरोली मतदार संघात बोगस मतदान होत असल्याची तक्रार अपक्ष उमेदवार हेमंत पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदवली. 

कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ 

राज्यभरात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना महायुतीचे वातावरण असल्याने ऐरोली आणि बेलापूरविधान सभा मतदारसंघात भाजपच्या दोन्ही उमेदवारांचे पारडे जड आहे. त्यामुळे आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. या चढाओढीतून काही कार्यकर्त्यांनी चक्क मतदान करताना ईव्हीएम मशिन आणि व्हिव्हीपॅट मशिनचे मोबाईलने छायाचित्र काढून निष्ठा सिद्ध केली आहे. हे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे मतदान केंद्रांवरील सुरक्षेचा प्रश्‍नावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. 

WebTitle : vidhan sabha 2019 mixed response of voters in navi mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 mixed response of voters in navi mumbai