राजकीय चढाओढीला सुरूवात

विधानसभा निवडणुकीचे पडसाद
विधानसभा निवडणुकीचे पडसाद

पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर तालुक्‍यात राजकीय प्राबल्य राखण्यात अनेक वर्षांपासून शिवसेना यशस्वी राहिले आहे. मात्र, सध्‍या विधानसभा निवडणुकीची राजकीय धुमाकूळ तालुक्‍यात सुरू झाली असून सर्वपक्षीय नेते, कार्यकत्‍यामध्‍ये चढाओढीचे चित्र दिसत आहे. 

देवळे गणातून दोन वेळा विजयी झालेले शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे कोंढवी गणातून लढत आहेत. तर देवळे गणातून सुमन कुंभार यांना उमेदवारी देत जिल्हा परिषदेत शेकापने खाते उघडले आहे. पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे गजानन कासार, काँग्रेसकडून दीपिका दरेकर व शैलेश सलागरे, तर शेकापकडून मंदा चांदे असे पक्षीय बलाबल तयार झाले आहे. यामुळे तालुक्‍यात शिवसेना, काँग्रेस व शेकाप यांची ताकद तूल्यबळ झाल्याचे समोर आले.

मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या वेळी तालुक्‍यातील राजकीय समीकरणे बदलली होती. पोलादपूर तालुक्‍यातील नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अनंत गिते यांना, तर राष्ट्रवादीचे आघाडीचे सुनील तटकरे यांच्यापेक्षा जवळपास एक हजार मतांचे मताधिक्‍य मिळाले. त्यामुळे तालुक्‍यातील एक नंबरचा पक्ष म्हणून पुन्हा शिवसेनाच सरस ठरली आहे. तरी शिवसेनेला पक्षांतर्गत नाराजीचा या वेळी मोठा फटका बसला होता. सद्यस्थितीत तालुक्‍यात नगण्य वाटणारी भाजपही वेगाने मुसंडी मारत आहे. शिवसेनेतील अंतर्गत नाराजी शमविण्यात विद्यमान आमदार भरत गोगावले यशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर मोठे पक्ष प्रवेशही शिवसेनेत होत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांच्या माध्यमातूनही संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे.  विकासात्मक मुद्द्यावर कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता दिसून येत आहे. 

विधानसभेच्या निवडणुकांचा वेध घेत असताना पक्षीय पटलावर मुख्य प्रवाहातील पक्षाची सूत्रे ठेकेदारांच्या हाती एकवटल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पक्ष हितापेक्षा ठेकेदारीवर लक्ष केंद्रित असणाऱ्यांकडून पक्षाची सूत्रे हाताळली जात आहेत. त्याबद्दल निष्ठावंतांकडून नाराजीही व्यक्त होत आहे. याची संबंधित पक्षाने योग्य दखल न घेतल्यास निवडणुकांमध्ये मतांची गणिते जुळवणे जिकिरीचे होणार असल्याची चर्चा राजकीय अभ्यासकांमध्ये केली जात आहे. मतदारराजा कोणाची गणिते जुळवणार कुणाची गणिते बिघडवणार? हे राजकीय प्रचार यंत्रणेचे आराखडे निकालानंतर स्पष्ट होतील. तोपर्यंत नाक्‍या-नाक्‍यावरील चर्चा किती रंगतदार होणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com