लोकसभा गमावली; तरीही विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रच!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 मे 2019

ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंका आहे. महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असे वाटते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता त्याबाबत अजून चर्चा झालेली नाही. मनसेला महाआघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत आज चर्चा झालेली नाही. 
- जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहणार असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची देखील एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचा निर्धार आज व्यक्‍त करण्यात आला. राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची समीक्षा करण्यात आली व आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, या बैठकीत प्रारंभी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक यावरही चर्चा झाली. महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढायचे ठरले असून, यासंदर्भात आणखी बैठका होतील.

विखे पाटील यांच्यासोबत आणखी काही आमदार भाजपात जातील असे वाटत नाही. ज्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

या बैठकीला ‘राष्ट्रवादी’चे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, सुनिील तटकरे, ‘सप’चे नेते अबू आझमी, युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा, हसन मुश्रीफ, बाबाजानी दुर्राणी, शेकाप नेते जयंत पाटील आणि गणपतराव देशमुख, भाकपचे नेते प्रकाश रेड्डी, नसीम खान, ‘बविआ’चे हितेंद्र ठाकूर, शरद रणपिसे, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, हेमंत टकले, अनिकेत तटकरे आदी आघाडीचे नेते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Mahaaghadi Congress NCP Politics