esakal | "महामुंबई" - सारे काही अपेक्षेनुसारच | Election Result Analysis 
sakal

बोलून बातमी शोधा

"महामुंबई" - सारे काही अपेक्षेनुसारच | Election Result Analysis 

"महामुंबई" - सारे काही अपेक्षेनुसारच | Election Result Analysis 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोणाचीही हवा नाही, लाट नाही, प्रचारात जनसामान्यांशी निगडित मुद्दे नाहीत अशा मरगळलेल्या वातावरणात महामुंबईत झालेल्या निवडणुकीचा निकालही अपेक्षेनुसारच लागला. मुंबईत शिवसेनेने आपले संख्याबळ कायम राखण्यात यश मिळविले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मात्र एका अधिक जागेचा लाभ झाला. विशेष म्हणजे यावेळी मुंबईत कॉंग्रेसनेही आपले संख्याबळ टिकविले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एका जागेचा फायदा झाला. ठाण्यात गेल्या वेळी युतीला तेरा जागा मिळाल्या होत्या. यावेळीही या जिल्ह्याने युतीला तेराचेच दान दिले. एवढेच नव्हे, तर मनसेचे विधानसभेतील गेल्यावेळेचे संख्याबळही यावेळी या जिल्ह्याने सावरून धरले. 

युतीचा फायदा सेनेला 

यावेळी शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र लढल्याचा फायदा प्रामुख्याने शिवसेनेला झाला. "मातोश्री'च्या दारातला वांद्रे पश्‍चिम हा मतदारसंघ बंडखोरीमुळे, तर अणुशक्ती नगर हा पक्षांतर्गत नाराजीमुळे सेनेला गमावावा लागला. मात्र त्याची भरपाई दोन नव्या जागा पदरात पडून झाली. त्यामुळे सेनेचे संख्याबळ जैसे थे राहिले. भाजपला मात्र या युतीचा फारसा फायदा झालेला नसला, तरी आयाराम कालीदास कोळंबकर यांच्या विजयाने भाजपने गिरणगावात प्रवेश केला आहे.

आणखी वाचा : मुंबई | 4 नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी ; 9 माजी नगरसेवक पराभूत

मुंबईत एमआयएम हा पक्ष केवळ अन्य पक्षांच्या मतविभाजनामुळेच निवडून येऊ शकतो हे या निवडणुकीने दाखवून दिले. भायखळ्यातील एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांचा 20 हजार मतांनी पराभव झाला. 

वांद्रे पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीमुळे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचा पराभव झाला. 10 वर्षांनंतर कॉंग्रेसने ही जागा परत मिळवली. पण कॉंग्रेसचा गड समजला जाणारा चांदिवली मतदारसंघ मात्र या पक्षाने गमावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक हे अणुशक्ती नगरमधून निवडून आले. 
मनसेने या निवडणुकीत 2017च्या महापालिका निवडणुकीपेक्षा चांगली कमाई केली. मात्र मनसेला मिळालेली मते ही मुळची सेना वा भाजपची असल्याचे मानले जाते. मुंबईत वंचित बहुजन आघाडीही फारशी चमक दाखवू शकलेली नाही.अनेक मतदार संघात त्यांना नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. 


आणखी वाचा :: मुंबई | 4 नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी ; 9 माजी नगरसेवक पराभूत
 

ठाणे जिल्ह्यात आयारामांमुळे युतीचे संख्याबल वाढेल असा अंदाज होता. पण तो फोल ठरला. मिराभाईंदर येथील विद्यमान भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांचा त्यांच्याच पक्षाच्या बंडखोर गीता जैन यांनी दणदणीत पराभव करुन युतीच्या नेत्यांनी जिल्ह्यात उमेदवारी वाटण्यात दक्षता घेतली नसल्याचा संदेश देण्यात यश मिळवले आहे.

कल्याण ग्रामीण येथे हमखास निवडणूक येणारा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी ऐनवेळी शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांचे तिकिट कापून रमेश म्हात्रे यांना संधी दिली. पण येथे मनसेचे राजू पाटील यांनी अनपेक्षित लढत देऊन मनसेला जिल्ह्यात एक जागा मिळवून देण्याची किमया केली. भिवंडी पूर्वमध्येही शिवसेनेला धक्का बसला. तेथे सेनेचे विद्यमान आमदार रुपेश म्हात्रे यांचा समाजवादी पार्टीच्या रईस शेख यांनी पराभव केला. या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकत ठेवण्याचे काम केले जितेंद्र आव्हाड (कळवा-मुंब्रा) आणि दौलत दरोडा (शहापूर) यांनी. ठाण्यातील सेनेच्या विजयामुळे एकनाथ शिंदे यांचे स्थान अधिक बळकट झाले आहे. 


आणखी वाचा : राज्यातून सर्वांत कमी मताधिक्याने 'या' उमेदवाराचा झाला विजय
 

बाजुच्याच पालघर जिल्ह्यातील सहा पैकी तीन जागांवर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने अपेक्षेनुसार यश मिळविले. तेथील नालासोपारा मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरली ती चकमकफेम प्रदीप शर्मा यांच्या उमेदवारीमुळे. मात्र त्यांना बविआचे क्षितिज ठाकूर यांनी अस्मान दाखविले. एकंदर काही अपवाद वगळता महामुंबईतील निकाल अपेक्षेनुसारच लागले. 

Webtitle : vidhansabha election results analysis off mumabi results

loading image
go to top