विक्रमादित्य सचिनकडून महाराष्ट्रातलं गाव दत्तक

संजय मिस्कीन - सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

सचिन यांनी डोणजे गाव दत्तक घेऊन उस्मानाबादमधून "स्मार्ट व्हिलेज‘ची सुरवात केली आहे. या जिल्ह्यातल्या स्मार्ट व्हिलेजचा सचिन ब्रॅंड ऍम्बेसिडर ठरला आहे. त्यांनी डोणजे गावाची निवड केल्याने तेंडुलकर कुटुंबीयाचे आभार. आता उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांत आदर्श गाव व स्मार्ट व्हिलेजची संकल्पना अधिक रुजण्यास मदत होणार आहे.
- आनंद रायते, मुख्याधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद 

उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजेचा कायापालट होणार; स्मार्ट व्हिलेजचा प्रारंभ
मुंबई - विक्रमादित्य सचिन तेंडुलकरची सामाजिक कार्याची भावना लपून राहिलेली नाही. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सचिनने सामाजिक जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातलं डोणजे हे दुर्गम गाव सचिनने दत्तक घेतलं आहे. संसद आदर्श ग्राम योजनेत सचिनने महाराष्ट्रातले पहिले गाव म्हणून डोणजेची निवड केली.

तत्पूर्वी आंध्र प्रदेशातलं गाव दत्तक घेतल्यानतंर सचिनच्या कार्याचे कौतुक केले जात होते. आता दुष्काळी परंडा तालुक्‍यातल्या डोणजे या गावची निवड करून सचिनने महाराष्ट्राशी असलेलं नातं जपले आहे. डोणजे गाव सीना कोळेगाव प्रकल्पात बाधित झालेलं गाव आहे. परंडा तालुका परिसर हा कायम दुष्काळी भाग. या गावातल्या नागरिकांची आर्थिक स्थिती बेताचीच; पण कायम क्रिकेटचं वेड असलेल्या या गावाची पंचक्रोशीतली ओळख म्हणजे या गावात भरणारे क्रिकेटचे सामने. राज्यात ज्या वेळी क्रिकेटचा फारसा प्रचार व प्रसार नव्हता, त्या वेळी या गावात ग्रामीण भागातले क्रिकेटचे सामने अत्यंत लोकप्रिय ठरलेले. गावातले सामाजिक व राजकीय ऐक्‍य बंधुत्वाचे. आजूबाजूच्या अनेक लहान गावांचे व वाड्यांचे ते मुख्य ठिकाण. एका बाजूला कायम कोरडं असलेले सीना नदीचं पात्र. तेथून खाली पाच किलोमीटरवर सीना कोळेगावचा प्रकल्प. याच प्रकल्पात डोणजे गावातल्या अनेक हेक्‍टर जमिनी गेलेल्या. या गावाला संसद आदर्श ग्राम योजनेतून सचिन तेंडुलकर यांनी दत्तक घेतल्याने या गावाचा आता कायापालट होण्याची आशा निर्माण झाली आहे. सचिन तेंडुलकर यांनी खासदार म्हणून या गावाची निवड केल्याने कायम दुष्काळी परंडा तालुका आता देशाच्या नकाशावर येणार असल्याने नागरिकांत उत्साही वातावरण आहे.

 

Web Title: Vikramaditya Sachin Tendulkar adopted Maharashtra village