
सफेद कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली या गावात सात ते आठ वर्षापासून खरीपातील भातपीक कापनीनंतर डिसेंबरमधे सफेद कांद्या लागवड केली जात आहे. मात्र या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत गावातील शेतकऱ्यांकडून सफेद कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाऊ लागली आहे. विक्रमगड तालुक्यापासुन जवळ असलेल्या मुंबई,वसई-विरार,पालघर,नालासोपारा, भाईंदर अशा शहरांतून या कांद्याला होणारी मागणी लक्षात घेऊन म्हसरोली गावातील शेतकरी अधिक प्रमाणात सफेद कांद्याच्या लागवड करू लागले आहेत.
सफेद कांद्याचे आगार म्हणून ज्या गावाची ओळख आहे अशा म्हसरोली येथील शेतकऱ्याच्या डोळ्यात याच कांद्याने अक्षरशः पाणी आणले आहे. या वर्षी कांद्या रोप तयार करण्यासाठी बी पेरणीच्या काळात अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात बी कुजल्याने कांद्या वाढीच्या काळात ढगाळ वातावरण असल्याने कांद्याची वाढ झाली नसल्याने या वर्षी म्हसरोळी भागातील सर्वच सफेद कांद्या उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन घटल्याने सफेद कांद्याचे भाव वाढतील असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
सफेद कांद्याचे आर्थिक गणित
म्हसरोली गावात सुमारे 120 शेतकऱ्यांनी अंदाजे 130 ते 140 एकर क्षेत्रात सफेद कांद्याची लागवड केली जात आहे. एकरी 30 ते 40 हजार खर्च सफेद कांद्याला येत असून. खर्च सोडून यातून 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पन्न एकरी शेतकऱ्याला मिळते. येथील सफेद कांद्या उत्तम दर्जाचा असल्याने त्याला समुद्रकिनारपट्टीत मोठी मागणी असते.
मागील दोन वर्षी ऐन हंगामात कोरोनाचा कहर वाढल्याने शेतकरी भुईसपाट झाला. त्यात गेल्या वर्षी बुरशीजन्य रोगामुले सफेद कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने गेल्या वर्षी ही सफेद कांद्या लागवड शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर पुन्हा नव्याने उभारी घेत शेतकऱ्याने जानेवारी महिन्यात कांद्या लागवड केली. कांद्या रोप तयार करण्यासाठी कांद्या बी पेरणी केल्या नंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे बी कुजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर कांद्या रोप वाढीच्या काळात ढगाळ वातावरण असल्याने करपा रोगाचे प्रादुर्भाव झाल्याने कांद्याची वाढ झाली नाही. त्यामुळे निम्मे उत्पादनात घट होणार असल्याचे म्हसरोळी येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
सफेद कांद्याचे औषधी गुणधर्म
सफेद कांद्याला औषधी गुणधर्म आहे. जर सर्दी किंवा कफची समस्या असेल तर ताजा कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते. रोज कांद्या खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होते हे मधुमेह रोगावर परिणाम करते. कच्च्या कांद्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अॅसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींपासूनही दूर ठेवते. रोज कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरताही दूर होते. यामुळे अॅनिमियाही दूर होतो, असे जाणकार शेतकरी सांगतात.
गेल्या दोन वर्षी कोरोना व निर्बधामुले सफेद कांद्या लागवड शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर गेल्या वर्षी ही बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या वर्षी चांगले उत्पादन येईल या आशेवर असताना कांद्या रोप तयार करण्यासाठी बी पेरणीच्या काळात अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात बी कुजल्याने कांद्या रोपांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे सफेद कांद्याचे निम्मे उत्पादन घटले असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. सफेद कांद्या उत्पादक गेल्या तीन वर्षा पासुन संकटात आहे.
- अनिल गोपाळ जाधव सफेद कांदा उत्पादक,शेतकरी, (म्हसरोली गाव)
अवकाळी पाऊसामुळे कांद्या रोप कुजुन गेले आणि आता ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कांद्याची वाढ झाली नाही. सफेद कांद्या उत्पादनात 50% घट झाल्यामुळे म्हसरोळीचे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. त्यात मिरची लागवडीवर काळे थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मिरची चे उत्पन्न च निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
-किरण विलास ठाकरे (शेतकरी,म्हसरोळी)
Web Title: Vikramgad Farmer Get Best White Onion Price Nafed Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..