एका जित्या जागत्या गावाला समुद्र गिळतो तेव्हा...

गणेशपट्टी गावाची १६ वर्षांनंतरही फरपट कायम
ganeshpatti
ganeshpattisakal

एकेकाळी भाताचे कोठार असलेले एक जिते जागते एक गाव सुमद्राच्या पाण्याखाली नामशेष झाले. त्यानंतर या गावाची फरपट सुरू झाली. ती तब्बल १६ वर्षांनंतरही थांबली नाही. ही कथा कुठल्या तरी परदेशातील बेटाची वगैरे नाही, तर अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गणेशपट्टी गावाची.

जागतिक तापमान वृद्धी, विकास प्रकल्पांसाठी समुद्र- खाड्यांमध्ये केलेला भराव आणि बांधबंदिस्तींच्या कामाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे जगभरातील अनेक गावे, शहरे संकटात आली, असे ऐकतो. तसेच गणेशपट्टी हे बुडालेले गाव आहे, असे अनेक वर्षांपासून ऐकत होतो. त्यामुळे या गावाला भेट देण्याची, ते पाहण्याची उत्सुकता अनेक वर्षांपासून होती. तसा योग दोन दिवसांपूर्वी आला.

दुचाकीने बंगलाबंदर येथे पोहचल्यानंतर गणेशपट्टी या गावाकडे पायी चालत जाणे शक्य नव्हते. मग, एका लहानशा होडीने धरमतर खाडीतून २० मिनिटांचा प्रवास करत एका निमुळत्या भागात शिरलो. दोन्ही बाजूला असलेल्या कांदळवनातून मार्ग काढत त्या गावातील तरुणाने एका दलदलीत होडी थांबवली. गुडघाभर चिखलातून पुढचा प्रवास सुरू झाला. गाव म्हणावे, अशा कोणत्याच खुणा दिसत नव्हत्या. माझ्या पुढे तरुण होता. तो एका चौथऱ्याजवळ थांबला. या ठिकाणी एकेकाळी मानवी वस्ती असावी, ही पहिली खूण होती. ते मारुतीचे मंदिर होते. छप्पर उडालेले, भिंतींची दुरवस्था झालेली, दारे- खिडक्या नसलेल्या या ठिकाणी केवळ मूर्ती आहे म्हणून ते मंदिर होते. त्या तरुणाने आठवणी जागवल्या. या मंदिरासमोर आमची जिल्हा परिषदेची मराठी शाळा होती. शाळा इमारतीच्या ठिकाणी मोठमोठी झाडे उगवल्याने त्याच्या म्हणण्याला दुजोरा मिळत नव्हता.

ganeshpatti
खुराडे, कोंबडी अन् कोंबडीचोर!

अनवाणी पायाखालचा चिखल तुडवत आम्ही दोघे जण पुढे निघालो, आता काही घरे दिसू लागली; परंतु सर्व मोडकळीस आलेली. घरात चिखल, अंगणात खारफुटी उगवलेली. ओसरीला चिंबोऱ्यांची घरे, कौले, वासे अशी सर्व भग्नावस्था पाहिल्यावर त्या तरुणाच्या म्हणजेच अक्षय पाटीलच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या भावंडांबरोबर अलिबाग तालुक्यातील या गणेशपट्टी गावात लहानपण घालवलेल्या अक्षयला गावकऱ्यांसह २० वर्षांपूर्वी गाव सोडावे लागले. प्रत्येकाची २० ते ३० खंडी पिकती जमीन, पक्क्या बांधकामाची घरे सोडून ३५ कुटुंबांना कायमचे स्थलांतर करावे लागले. ही सुरुवात आहे. अशाच प्रकारे बहिरीचापाडा, माणकुळे, रांजण-खार डावली या गावांमध्येही समुद्राचे खारे पाणी येत असते.

ganeshpatti
तालिबानला चर्चेत गुंतवून ठेवणे गरजेचे

पाण्याची पातळी दरवर्षी वाढत चालली आहे, तशी या परिसरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. याची सुरुवात गणेशपट्टी या गावापासून झाली, असे अक्षय सांगत होता. पूर्वी घरासमोरच्या अंगणात लहान मुले, गाई-ढोरे खेळत होती. हनुमान जयंती, दसरा, दिवाळी, गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत होते. आता या केवळ आठवणी उरल्या. अक्षयचे घर गावाच्या दुसऱ्या टोकाला आहे. त्याच्या घरापर्यंत कांदळवनातून जाणे शक्य नव्हते. त्याच्या घरापर्यंत होडीतून जावे लागले. भाताचे कोठार, देवघर, स्वयंपाक घर त्याने दाखवले. पडक्या घराकडे पाहून त्याच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या.

ganeshpatti
राजकीय संस्कृतीचे एन्काउंटर !

तो माहिती देत असतानाच पावसाची रिमझीम सुरू झाली. भरतीचे पाणीदेखील वाढू लागले होते. त्यामुळे परत सुरक्षित स्थळी पोहचण्यासाठी घाई सुरू होती; परंतु अक्षय तेथेच जुन्या आठवणीत गुंतला होता. शेवटी पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा कांदळवनातून तीच कसरत करत बंगला बंदरला यावे लागले. पूर्वी बंगला बंदर येथून बांधावरून गणेशपट्टीला चालत जाता येत असे; बांधाला एक लहानशी खांड गेली, ती दुरुस्त झाली नाही. याला राजकीय, सरकारी उदासीनताही तितकीच जबाबदार आहे.

ganeshpatti
दुधारी तलवार जातमोजणीची

असा झाला ऱ्हास

  • १९८० पर्यंत येथील शेतकरी बांधबंदिस्ती स्वकष्टाने करीत होते. दर वर्षी बंधाऱ्यांची दुरुस्ती नित्यनियमाने होत असे; परंतु याचदरम्यान खारभूमी हे राज्य सरकारचे नवे खाते अस्तित्वात आले. येथूनच धरमतर खाडीतील हजारो शेतकऱ्यांची अधोगती सुरू झाली.

  • खारभूमीचा विकास करण्यासाठी जे खाते अस्तित्वात आले, त्याच खात्यातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे बंधाऱ्यांची दुरुस्ती झालीच नाही. यास येथील राजकीय नेतेमंडळीही तितकीच जबाबदार होती. अधिकाऱ्यांना जाब विचारणारी नेते मंडळी नसल्याने दुर्लक्ष होत गेले.

ही जमीन तीनशे वर्षांपूर्वीही पाण्याखाली होती. स्वराजाचे सागरी आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांना सरखेल पद मिळाल्यानंतर त्याचे मुख्यालय सागरगड येथे होते. त्या वेळेस भातशेती कमी होती. यामुळे महसूल कमी मिळत असे. त्यांनी खाडीकिनाऱ्यालगतची जमीन पिकती करण्याचा प्रयत्न केला.

- राजन भगत, सामाजिक कार्यकर्ते, धेरंड-शहापूर

गणेशपट्टी ग्रामस्थांचे तीनवीरा धरणाच्या शेजारी स्थलांतर करण्यात आले आहे; परंतु येथे घरे बांधण्यासाठी ग्रामस्थांना कमी जमीन मिळाली. या ठिकाणी उत्पन्नाचे कोणतीही साधन नाही. त्यामुळे बेरोजगारीचा सामना करावा लगत आहे. सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केले.

- मंगेश पाटील, ग्रामस्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com