योजनेच्या नावाने गावकऱ्याची दलालाव्दारे लूट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

''घरकुल तुझे मंजुर झाले, तुला पैसे द्यावे लागतील, असे सांगत गावकऱ्याला गोरेगावात आणतो व पैसे घेतल्यानंतर मी साहेबांना भेटून येतो, असे सांगतो अशी माहिती ८ गावांतील नागरिकांनी दिली. मात्र, तो कोण ही माहिती देत नसल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाही''.

दिनेश हरिणखेडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती गोरेगाव, गोंदिया

गोरेगाव ( गोंदिया) : पंचायत समितीव्दारे शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी म्हणून गरजू लाभार्थ्यांची यादी ऑनलाइन केली जाते. लाभार्थी अनेक, उद्दिष्टे ठराविक असल्याने प्रधानमंत्री आवास योजना, पशुसंवर्धन विभागाच्या योजनेकरीता लाभार्थ्यांची चढाओढ सुरु असल्याने गोरेगाव तालुक्यात दलाल सक्रीय झाले आहेत.

घरकुल मंजूर झाले पैसे द्या व माझ्यासोबत चला, असे अज्ञात दलालाकडून सुरु असल्याने आतापर्यत आठ गावांतील नागरिकांना लुटण्यात आल्याची माहिती संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. दलाल कोण ? असे फसवणूक झालेले गावकरी सांगत नाही. त्यामुळे पोलिसांत तक्रार करावी कोणाची ? असा प्रश्न कर्मचाऱयांसमोर असल्याचे सांगत आजपर्यंत तक्रार करण्यात आलेली नाही. 

घरकुल योजनेसोबतच पशु संवर्धन विभागातही दलाल सक्रीय झाल्याचे कर्मचारी माहिती देत आहेत. लूट केलेल्या व्यक्तीची तक्रार पोलिसांत होत नसल्याने दलालाचे मनोधैर्य वाढलेले आहे. गावातील योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी कोण पुरवितो हा प्रश्न कर्मचाऱ्यांना करण्यात आला. त्यावर ते सांगतात, की गरजू लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायतीमध्ये असते. कदाचित यावरुन माहिती होत असेल, अशी माहिती देतात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि दलालावर आळा बसला पाहिजे अशी मागणी केली जात आहे.

Web Title: villegers have been looted by Agents