esakal | नाशिकनंतर विरारमध्ये रुग्णालयात अग्नितांडव, १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

 fire at COVID hospital in Virar

नाशिकनंतर विरारमध्ये रुग्णालयात अग्नितांडव, १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. रुग्णालयातील १७ रुग्ण या आगीत अडकले असून अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आता रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याची सुरुवात केली आहे. नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरारमध्ये झालेल्या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.

चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

हेही वाचा: विरार रुग्णालय दुर्घटना - डॉक्टरांनी सांगितले आगीचे कारण

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. यात अतिदक्षता विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली.

रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या घटनास्थळावर नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. सध्या ही आग पूर्णपणे विझवण्यात आली असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

loading image