esakal | "विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी"

बोलून बातमी शोधा

ajit pawar
"विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी"
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल त्यांनी सहसंवेदनाही व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली. अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा: विरार हॉस्पिटल अग्नितांडव नॅशनल न्यूज नाही - राजेश टोपे

"रुग्णालयांची सुरक्षितता, फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्याने घेतली जाईल. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल", असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

विरारच्या कोविड हॉस्पिटलला लागली आग

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शुक्रवारी पहाटे आग लागली. चार मजली रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. यावेळी अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. पहाटे ३ नंतर ही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे साडेपाचच्या सुमारास आग विझवली. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

हेही वाचा: VirarFire: "माझी जबाबदारी आहे हे मी नाकारत नाही, पण..."

मुख्यमंत्र्यांनी या आगीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे. विरार रुग्णालय आगीतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमींना १ लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील हा घटनेबाबत शोक व्यक्त केला. तसंच मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून जाहीर करण्यता आली. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.