esakal | Virar Hospital Fire: मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

बोलून बातमी शोधा

virar covid hospital fire
Virar Hospital Fire: मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. रुग्णालयातील १७ रुग्ण या आगीत अडकले होते. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहोचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्यांशी बातचीत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवून आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

हेही वाचा: Virar Hospital Fire: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

नेमकी घटना काय?

चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. यात अतिदक्षता विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सदर घटनास्थळी विरार अग्निशमन दलाचे ०३ फायर वाहन उपस्थित होते. सदरची आग अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे ०५:२० वा. सुमारास विझवण्यात आली.

हेही वाचा: नाशिकनंतर विरारमध्ये रुग्णालयात अग्नितांडव, १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू

आगीत मृत्यू झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे

उमा सुरेश कनगुटकर- वय ६३ वर्षे

निलेश भोईर- वय ३५ वर्षे

पुखराज वल्लभदास वैष्णव- वय ६८ वर्षे

रजनी आर कडू- वय ६० वर्षे

नरेंद्र शंकर शिंदे- वय ५८ वर्षे

कुमार किशोर दोशी- वय ४५ वर्षे

जनार्दन मोरेश्वर म्हात्रे- वय ६३ वर्षे

रमेश टी उपायान- वय ५५ वर्षे

प्रवीण शिवलाल गौडा- वय ६५ वर्षे

अमेय राजेश राऊत- वय २३ वर्षे

शमा अरुण म्हात्रे- वय ४८ वर्षे

सुवर्णा एस पितळे- वय ६४ वर्षे

सुप्रिया देशमुख- वय ४३ वर्षे