esakal | VirarFire: रूग्णालय व्यवस्थापनावर गुन्हा दाखल; तीन नावांचा समावेश

बोलून बातमी शोधा

 fire at COVID hospital in Virar
VirarFire: रूग्णालय व्यवस्थापनावर गुन्हा दाखल; तीन नावांचा समावेश
sakal_logo
By
विजय गायकवाड

मुंबई: विरार पश्चिमेकडील विजय वल्लभ कोव्हिडं रुग्णालयात एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन जागीच 13 तर उपचारा दरम्यान 2 अशा एकूण 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर आणि कर्मचाऱ्यांवर भारतीय दंड विधानाच्या कलम 304, 337, 338, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात 3 जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप आरोपी करण्यात आलेले नाही. संपूर्ण चौकशीमध्ये कुणाची काय भूमिका आहे? कुठे हलगर्जीपणा झाला? यात हॉस्पिटल प्रशासनचा निष्काळजीपणा काय झाला? याचा पूर्ण तपास करूनच भूमिका ठरवली जाईल आणि मग त्याप्रमाणे त्यांना आरोपी करण्यात येईल, अशी माहिती मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त परिमंडळ 2 चे पोलीस संजय पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: विरार हॉस्पिटल अग्नितांडव नॅशनल न्यूज नाही - राजेश टोपे

विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत जागीच १३ तर नंतर काही वेळातच उपचारादरम्यान 14व्या रूग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रात्री उशीरा 15 व्या रुगणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. निरव संपत (वय 31) असे मृत्यू झालेल्या 15 व्या रूग्णाचे नाव असून कांदिवलीच्या कस्तुरबा रुग्णालयात त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. विजय वल्लभमधील दुर्घटने संदर्भात झालेल्या मृत्यूला जबाबदार धरून, प्राथमिक तपासात व्यवस्थापक दिलीप शहा, बस्तीमल शहा, डॉ. शैलेश पाठक यांचे नाव गुन्हा दाखल झालेल्या तक्रारीत दाखल करण्यात आले आहे. पण या नावांचा आरोपी म्हणून अद्याप समावेश करण्यात आलेला नाही. अतिदक्षाता विभागातील cctv, घटनास्थळावरील प्रत्यक्ष पंचनामा, वसई विरार महापालिकेचा जवाब, या गोष्टींची चौकशी केल्यानंतर जे कोणी दोषी आढळेल, त्यांना यात आरोपी करण्यात येणार आहे. 'घडलेली घटना दुर्दैवी आहे. ही पूर्ण चौकशी पारदर्शक होऊन यात मॅनेजमेंट असो किंवा डॉक्टर-नर्स असो.. जे कोणी दोषी आढळेल त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल', असे पाटील यांनी सांगितले आहे.

(संपादन- विराज भागवत)