
Virar Rickshaw driver incident: पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये शनिवारी एका रिक्षा चालकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्राविरुद्ध 'आक्षेपार्ह' टिप्पणी केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चालकाला चांगला चोप दिला आहे. यानंतर संबंधित रिक्षा चालकाने माफी मागितली आहे.
काही दिवसांपूर्वी विरार स्टेशन परिसरात मराठी भाषेवरून एका रिक्षा चालक आणि एका दुचाकीस्वार यांच्यात वाद झाला होता. रिक्षा चालक तरुणाला धमकावत होता आणि मराठी भाषेत बोलल्याबद्दल त्याला विरोध करत होता. रिक्षा चालकाने तरुणाला धमकावले आणि त्याला भोजपुरी आणि हिंदी बोलण्यास भाग पाडले.
व्हायरल व्हिडिओनुसार, ही घटना विरार रेल्वे स्थानकाजवळील एका वर्दळीच्या रस्त्यावर घडली. बाहेरून आलेल्या स्थलांतरित चालकाने मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य आणि मराठी प्रतीकांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचे वृत्त आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिक राजकीय संघटना आणि लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा 'अपमान' केल्याबद्दल त्याला जाहीर माफी मागण्यास भाग पाडण्यात आले.
याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरार शहर प्रमुख उदय जाधव म्हणाले, "जर कोणी मराठी भाषा, महाराष्ट्र किंवा मराठी लोकांचा अपमान केला तर त्यांना शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल. आम्ही शांत बसणार नाही." तसेच, ते म्हणाले की, चालकाने महाराष्ट्र आणि मराठी माणसाविरुद्ध बोलण्याचे 'हिंमत' केली होती, म्हणून त्याला 'धडा शिकवण्यात आला' आणि लोकांची माफी मागण्यास भाग पाडण्यात आले.