विश्वनाथ पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

सुचिता करमरकर
रविवार, 7 एप्रिल 2019

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले विश्वनाथ पाटील यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

कल्याण : भिवंडी लोकसभेसाठी शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून कपिल पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. मात्र त्यांच्यासमोर प्रत्येक दिवशी एक नवीन समस्या उभी राहत आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली. तसेच 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले विश्वनाथ पाटील यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  

मुंबई विमानतळावर अत्यंत घाईगडबडीत ही भेट झाली असली तरी कुणबी सेनेच्या मागण्यांवर पुन्हा एकदा चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दरम्यान विश्वनाथ पाटील 9 एप्रिल रोजी भिवंडी लोकसभेतून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विश्वनाथ पाटील यांनी यापूर्वीच काँग्रेसच्या सर्व पदांचे राजीनामे दिले आहेत.

भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत भिवंडी लोकसभेतून कपिल पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासात कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. 2019 मधेही पहिल्या यादीत कपिल पाटील यांचे नाव जाहीर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कपिल पाटील यांना मित्रपक्षातील पदाधिकाऱ्यांकडून खडेबोल ऐकावे लागले.  

कल्याणला झालेल्या युतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात कपिल पाटील यांनी चक्क माफी मागत आपल्याकडून अधिक-उणे बोलले गेले असल्यास विसरून जावे, असे सांगितले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी आपण मला मतदान करा, असे कळकळीचे आवाहनही पाटील यांनी केले होते. मात्र, त्यानंतरही शिवसैनिकांची नाराजी कमी झाली नाही. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील यांच्यावरील नाराजी जाहीरपणे मांडली होती.

कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र शिवसेनेला दिले नाही तर प्रचार करणार नाही, असा पवित्रा स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. पक्षांतर्गतही पाटील यांना अनेक अडथळे आहेत. मात्र, विश्वनाथ पाटील यांची मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या भेटीनंतर त्यांच्यासमोर अजून एक समस्या उभी राहिल्याचे पाहायला मिळाले.

विश्वनाथ पाटील हे मूळचे भारतीय जनता पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते. काही वर्षांपूर्वी कुणबी सेनेची स्थापना केल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम केला. दरम्यान पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2014 मध्ये भिवंडीतून लोकसभेची निवडणूकही लढवली. 2019 मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी विश्वनाथ पाटील यांनी प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसने सुरेश टावरे यांना संधी दिल्याने पाटील यांनी आपल्या पदांचे राजीनामे देत नाराजी व्यक्त केली.

तसेच 9 एप्रिल रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून विश्वनाथ पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसनेही अद्याप कोणत्याही उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म दिलेला नाही. विश्वनाथ पाटील यांच्यासह सुरेश मामा म्हात्रे यांनीही काँग्रेसच्या तिकिटासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

Web Title: Vishwanath Patil met Chief Minister Devendra Fadnavis