#VoteTrendLive उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेनेत चुरस

टीम ई सकाळ
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

चौदाव्या प्रभागातदेखील शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. पक्षाचे सुनिल सुर्वे, शेखर यादव, मिताली चान्पुर आणि लीलाबाई आशान या चारही उमेदवारांना विजय प्राप्त झाला आहे.

उल्हासनगर - यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत चुरशीची लढत सुरु असल्याचे दृश्य आहे. दुपारी साडेबारापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार शिवसेनेने 20 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. शिवसेना आणि भाजपा प्रत्येकी 12 जागांवर विजय प्राप्त झाला आहे. राष्ट्रवादीला चार जागांवर शिक्कामोर्तब करण्यात यश आले आहे. परंतु, देशातील प्रमुख पक्ष काँग्रेसला अद्याप एकही जागा मिळालेली नाही.
 
चौथ्या प्रभागात शिवसेनेच्या चारही उमेदवारांना यश मिळाले आहे. या प्रभागातून शिवसेनेचे स्वप्नील बागुल, सुरेखा आव्हाड, अंजना म्हस्के, कुलवांतसिंग सोहंता यांचा विजय झाला आहे. त्याचप्रमाणे, पाचव्या प्रभागात भाजपच्या मीना कुमार आयलानी, सोनू छाप्रू, प्रकाश नाथानी, गीता साधनानी यांनी विजय मिळविला आहे. सहाव्या प्रभागातदेखील भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. या प्रभागात पक्षाच्या रेखा ठाकूर, सरोजिनी टेकचंदानी, जया प्रकाश मखिजा, महेश सुखरामनी यांनी आघाडी घेतली. प्रभाग 17 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरत गंगोत्री, सुनिता बगाडे, सुतरामदास जेसवाणी, पुजा कौर लांबना यांना विजय प्राप्त झाला आहे.

सातव्या प्रभागात मात्र आरपीआय आणि भाजपला 50-50 जागा मिळाल्या आहेत. शिवशक्ति भीमशक्ति युतीचे रिपाइ आठवले गटाचे दाम्पत्य भगवान भालेराव आणि अपेक्षा भालेराव विजयी झाले. याच प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या शुभांगिनी निकम आणि लक्ष्मी सिंग यांनी विजय मिळविला आहे. याशिवाय, नवव्या प्रभागात साई पक्षाचे अजित गुप्ता यांनी आपले खाते उघडले आहे. याच प्रभागात भाजप महिला गटाने आघाडी घेतल्याचे दिसून आले. या प्रभागात भाजपच्या दीपा पंजाबी आणि डिंपल ठाकूर विजयश्री प्राप्त केली. 

चौदाव्या प्रभागातदेखील शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. पक्षाचे सुनिल सुर्वे, शेखर यादव, मिताली चान्पुर आणि लीलाबाई आशान या चारही उमेदवारांना विजय प्राप्त झाला आहे.

Web Title: #VoteTrendLive BJP-Shivsena neck to-neck in Ulhasnagar