मतदानाची टक्केवारी घटणार!

शर्मिला वाळुंज
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

मतदानाविषयी मतदारांमध्ये अनास्था मोठ्या प्रमाणात दिसून येत असून मतदान करूनही शहरातील प्रश्न तसेच राहत असतील तर मतदान करून काही फायदा आहे का? त्यापेक्षा दोन दिवस सुट्टीचा आनंद तरी घेता येईल. रविवार-सोमवार दोन दिवस सुट्टी मिळाल्याने अनेकांनी बाहेर जाण्याचे बेत आखले आहेत.

ठाणे : मतदानाविषयी मतदारांमध्ये अनास्था मोठ्या प्रमाणात दिसून येत असून मतदान करूनही शहरातील प्रश्न तसेच राहत असतील तर मतदान करून काही फायदा आहे का? त्यापेक्षा दोन दिवस सुट्टीचा आनंद तरी घेता येईल. रविवार-सोमवार दोन दिवस सुट्टी मिळाल्याने अनेकांनी बाहेर जाण्याचे बेत आखले आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे नेते आमच्यासमोर तुल्यबळ विरोधकच नसल्याने आमचाच विजय होणार, असा जोरात प्रचार करीत आहेत. जनमानसातही महायुतीचे उमेदवारच निवडून येतील, अशीच भावना झाल्याने मतदान तरी कशाला करायचे, असा सूर मतदार आळवत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी २१ ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी सरकारी, निमसरकारी कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. रविवार व सोमवार सलग दोन दिवस सुट्टी मिळत असल्याने काही मतदारांनी बाहेर जाण्याचे बेत आखले आहेत. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. 

निवडणुकांमध्ये महायुतीचा मोठा विजय झाला. परिणामी विधानसभा निवडणुकीमध्येही महायुतीचे नेते आमच्यासमोर तुल्यबळ विरोधक नसल्याचे सांगत आमचाच विजय पक्का असल्याचे मतदारांना सांगत आहेत. जर विजय पहिलाच निश्‍चित झाला असेल, तर आमच्या मतांनी काय फरक पडणार? मतदान करूनही शहरातील प्रश्न जसेच्या तसेच आहेत. रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि त्यामुळे जाणारे जीव, महापूर यांसारख्या शहरातील समस्यांमुळे मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कोणीही निवडून येवो, काही सुधारणा होणार नाही, असे मत मतदार व्यक्त करीत आहेत.

उमेदवारांचे भावनिक आवाहन 
विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्नांना प्राधान्य दिले जाते. त्या प्रश्नाभोवतीच या निवडणुका लढविल्या जातात. एका-एका गटाचे मतदान या निवडणुकीत उमेदवारांसाठी महत्त्वाचे असते. मतदारांचा निरुत्साह पाहता उमेदवारांमध्ये काळजीचे वातावरण असून प्रचारादरम्यानच पक्षांचे नेते मतदारांना सुट्टीचा लाभ हा लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी घ्या. तुमच्या एका मताचेही मोल असून ते आमच्या पारड्यात टाका, असे भावनिक आवाहन करीत आहेत.

काहींनी तर मतदानाचा हक्क बजावू; परंतू आम्ही ‘नोटा’ला मतदान करणार आहोत. कोणत्याही पक्षाचा उमेदवार विजयी होवो; परंतू आम्हाला शहरात सुविधा हव्या आहेत. त्याच आम्हाला मिळत नाहीत, तर निवडणुकांमध्ये आम्ही कशासाठी उमेदवार निवडून द्यायचे. आमच्या मतांची किंम्मत आज कोणत्याही पक्षाला राहिली नसल्याने मी नोटाचा वापर करणार
- अनिरुद्ध करंदीकर, मतदार

मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली आहे. सुट्टीचे दोन दिवस आम्ही आनंदात घालविणार आहोत. उन्हातान्हात उभे राहून उमेदवारांना मतदान करायचे आणि तेच उमेदवार पुढील पाच वर्षे तुमच्या समस्यांना विचारातही घेणार नाहीत. मतांची टक्केवारी याचमुळे कमी होते. मतदानच कमी झाले तर त्यांच्या पाठीशी किती जनता आहे याचा त्यांनी विचार करावा.
- प्रदीप गव्हाणे, मतदार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting percentage will drop!