उमेदवारांकडून वोटिंग शाळा 

रश्‍मी पाटील - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

उमेदवार मतदारांच्या अज्ञानाचा किंवा संभ्रमाचा फायदा घेत त्यांच्या गोंधळात आणखी वाढ करत आहेत...

ठाणे - पालिकेच्या निवडणुकांसाठी मतदारांना यंदा पॅनेल पद्धतीने मतदान करायचे आहे. इतकी वर्षे एक किंवा क्वचित दोन उमेदवारांना मतदान करायची माहिती मतदारांना होती; मात्र यंदाच्या या चार जणांच्या पॅनेलमुळे मतदारांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. या गोंधळामुळे आपली मते बाद होऊ नयेत, या भीतीपायी उमेदवारांनी मतदारांची वोटिंग शाळा घ्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये काही उमेदवार मतदारांच्या अज्ञानाचा किंवा संभ्रमाचा फायदा घेत एकाच पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदान करायचे, असे सांगून त्यांच्या गोंधळात आणखी वाढ करत आहेत. 

प्रचाराच्या शेवटच्या चार दिवसात उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली आहे. रणरणत्या उन्हात उमेदवार तहानभूक विसरून प्रचार करत आहेत. पॅनेल पद्धतीत मतदान कसे करायचे याबाबत मतदारांमध्ये संभ्रम असल्याचे प्रचारादरम्यान उमेदवारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता प्रचार करताना नुसता प्रचार न करता मतदारांना कसे मतदान करायचे आहे, याची विस्तृत माहिती दिली जात आहे. काही उमेदवारांनी तर फोटो अथवा पत्रके तयार करून ती वाटण्यास सुरुवात केली आहे. हीच माहिती फेसबुक व व्हॉट्‌सॲपच्या ग्रुपवर पाठवली जात आहे. प्रचार करताना आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे क्रमांक मशीनवर कुठे असतील, कितव्या क्रमांकाचे बटन दाबायचे, याविषयी माहिती मतदारांना परत परत सांगितली जात आहे. काही उमेदवारांनी मतदारांच्या पॅनेलबाबतच्या अज्ञानाचा फायदा घेत तुम्हाला एकाच पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावे लागेल, असा प्रचार सुरू केला आहे. अशा या दुहेरी प्रचाराच्या प्रकारामुळे उमेदवारांचा कुठे फायदा; तर कुठे तोटा होणार हे निश्‍चित. 

मतदारांमध्ये संभ्रम 
पॅनेल मतदानाच्या अज्ञानामुळे किंवा उमेदवारांकडून निर्माण केल्या जाणाऱ्या संभ्रमामुळे मतदानाच्या आकडेवारीत फरक पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाद होणाऱ्या मतांचा आकडा वाढेल, की मतदानाविषयी व्यवस्थित माहिती करून घेत सुजाण नागरिक योग्य पद्धतीने योग्य उमेदवाराला मतदान करतील, हे निवडणूकीचा निकालच सांगेल.

Web Title: voting schools