एसटीच्या व्हीटीएस यंत्रणेचा बोजवारा

st
st

मुंबई : बसस्थानकावर येणाऱ्या प्रत्येक गाडीची योग्य माहिती देण्यासाठी एसटीने व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) सुरू केली होती. मात्र, ही यंत्रणा आता कुचकामी ठरली आहे. एसटीचे मुख्यालय असेलल्या मुंबई सेंट्रल बस स्थानकावर प्रवाशांना व्हीटीएसची माहिती मिळण्यासाठी लावलेले टीव्ही स्क्रीन बंद असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 

बसस्थानकावर बस किती वेळात पोहोचणार, बसचे लोकेशन, बस कोणत्या फलाटावर लागणार याबाबत प्रवाशांना माहिती मिळावी म्हणून एसटीने व्हीटीएस प्रणाली सुरू केली होती. त्यासाठीचे बसस्थानकांवर टीव्ही संच बसवण्यात आले; मात्र हे टीव्ही स्क्रीनच बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नाशिक विभागानंतर मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बसमध्येही व्हीटीएस प्रणाली बसवण्यात आली होती; मात्र त्याचा कोणताही फायदा प्रवाशांना नसल्याचे दिसून येत आहे. या व्हीटीएस प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. यामध्ये व्हिडीओ वॉलच्या साह्याने एसटी बसचे निरीक्षण केले जाते. यात वाहनाचा वेग, वाहनाचे आगमन-निर्गमन तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्‍यक अहवालसुद्धा तयार केला जातो; मात्र त्याचा फायदा प्रवाशांना होत नसल्याने व्हीटीएस प्रणाली पांढरा हत्ती ठरण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 
------------------ 
मोबाईल ऍपही येणार? 
व्हीटीएस प्रणालीबाबत सध्या चाचणी सुरू आहे. या प्रणालीचे मोबाईल ऍप प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. प्रवाशांना व्हीटीएसवरील माहिती ऍपवर मिळणार असल्याची माहिती एसटी विभागातील अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com