गिधाड संवर्धनाचा इंडोनेशियात गौरव

प्रेमसागर मेस्त्री यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्‍यात आला.
प्रेमसागर मेस्त्री यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्‍यात आला.

महाड (बातमीदार) : इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शिकारी पक्षीगण संवर्धन परिषदेमध्ये रायगड जिल्ह्यातील गिधाड संवर्धन कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. भारतीय गिधाडांवरील रायगड जिल्ह्यातील गिधाड प्रकल्पांवर पक्षीतज्ज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांनी या परिषदेत स्लाईड शोद्वारे आपले सादरीकरण केले. त्यांच्या गिधाड संवर्धन कामाबद्दल त्यांना या परिषदेत सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

इंडोनेशियातील बाली येथे २ ते १६ ऑक्‍टोबरदरम्यान चालणाऱ्या या परिषदेत ६० देशांनी आपले प्रबंध नोंदवलेले आहेत. त्याचे सादरीकरण, अभयारण्य संवर्धन प्रकल्प आणि इतर उपक्रमांचा समावेश केलेला आहे. इंडोनेशियातील या अकराव्या पक्षी संवर्धन परिषदेचे उद्‌घाटन विविध कार्यक्रमांद्वारे करण्यात आले. डायरेक्‍टर जनरल ऑफ कंजर्वेशन नॅचरल रिसोर्सेस मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल बाली प्रोविन्स आणि बाली भरत अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेची जबाबदारी घेतलेली आहे.

या वेळी जपानचे हिरोयोशी हिगुची, इरा विरालो (इंडोनेशिया), डेनिस साल्वाडोर (फिलिपिन्स), चोनचूम हंसासुता (थायलंड) तसेच अमेरिका, रशिया व युरोप आदी भागांतील पक्षिप्रेमींची उपस्थिती होती. रामायणातील काही प्रसंग तसेच कृष्णाच्या कालियामर्दनाचे नाट्यरुपी सादरीकरणही या वेळी करण्यात आले. या परिषदेत मेस्त्री यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्यांनी रायगड जिल्ह्यात केलेल्या गिधाड संवर्धनाच्‍या सादरीकरणाचे कौतुक करण्यात आले आहे.

शिकारी पक्ष्यांचे अस्तित्व धोक्‍यात!
गरुड, घार, ससाणे, गिधाडे, घुबड अशा शिकारी पक्ष्‍यांचे वर्ग पर्यावरणातील बदलांची कारणे शोधण्यासाठी मदत करत असतात. हिवाळ्यामध्ये दक्षिण व उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडून पूर्व आशियामध्ये अनेक पक्षी स्थलांतरित होत असतात. या प्रवासातील त्यांचे थांबे फार महत्त्वाचे मानले जातात; परंतु अशा पक्ष्यांची शिकार केली जात असल्याने त्‍यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. अशा पक्ष्‍यांच्या रक्षणासाठी अभयारण्य निश्‍चित करण्याबाबत अनेक देश पुढे आले आहेत. त्यातूनच अशियाई पक्षी संवर्धन व संशोधन परिषदेच्या माध्यमातून १९९८ मध्‍ये जपान येथे पहिली परिषद घेण्यात आली. इंडोनेशियातील या परिषदेत अशा बाबींवर विचार करून विविध उपाययोजनाही सूचविण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com