कृषी सहाय्यकांच्या काम बंद आंदोलनामुळे ऐन शेती हंगामात शेतकरी अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

गाव पातळीवर थेट शेतकऱ्यांशी संपर्क असलेले कृषि सहाय्यक आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या महिनाभयापासून विविध प्रकारची आंदोलने करीत आहेत. 10 जुलैपासुन सर्वच कृषि सहाय्यकांनी काम बंद आंदोलन सुरु केल्याने शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान तसेच तातडीची माहिती मिळणे अशक्‍य झाले आहे.

वाडा (जि. पालघर) - गाव पातळीवर थेट शेतकऱ्यांशी संपर्क असलेले कृषि सहाय्यक आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या महिनाभयापासून विविध प्रकारची आंदोलने करीत आहेत. 10 जुलैपासुन सर्वच कृषि सहाय्यकांनी काम बंद आंदोलन सुरु केल्याने शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान तसेच तातडीची माहिती मिळणे अशक्‍य झाले आहे.

कृषी सहाय्यकाच्या या आंदोलनामुळे शेतकरीही अडचणीत आला आहे. फळबाग लागवडीपासून ते पीक विम्यापर्यंत अशा विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत  पोहचविण्याचे काम कृषि सहाय्यक करतो. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातील सुमारे 80 टक्के कामे कृषि विभागाकडूनच केली जातात. अशा अनेक कामात शेतकऱ्यांचा महत्वाचा दुवा असणा-या कृषि सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून साखळी उपोषण, धरणे आंदोलन, निदर्शने, मोर्चा अशी आंदोलने केली, मात्र या आंदोलनांची दखल न घेतल्याने सोमवार 10जुलैपासून या कामबंद आंदोलनामध्ये ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व कृषि सहाय्यक सहभागी झाल्याचे महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेचे राज्य प्रतिनिधी संजय घरत यांनी सांगितले.

कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करणेत यावा, कृषी सहाय्यकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे 100 टक्के पदोन्नतीने भरणेत यावीत, आंतरसंभागीय बदल्या नियमित कराव्यात अशा अनेक मागण्यांसंदर्भातचे निवेदन राज्याचे कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांना महिनाभरापुर्वीच दिले आहे. मात्र आजवर कुठलीच दखल न घेतल्याने काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष कमळाकर घरत यांनी सांगितले तर या आंदोलना नंतर अमरण उपोषणही करण्याच्या तयारीत कर्मचारी असल्याचे संघटनेचे कार्यध्यक्ष संघटनेचे कार्यध्यक्ष भालचंद्र पाटील, सचिव महेश शितोळे, दिलीप घरत, अंकुश बेलकर, जयवंत बाळशी यांनी सांगितले.

Web Title: wada news palghar news agri assistant farmer

फोटो गॅलरी