वाधवांचा ताबा ईडीकडेच!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

पीएमसी गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

मुंबई : पंजाब ॲण्ड महाराष्ट्र सहकारी बॅंक (पीएमसी बॅंक) गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी राकेश वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राचा ताबा गुरुवारपर्यंत (२४) सक्तवसुली संचालनालयाकडेच ठेवावा, असे निर्देश विशेष न्यायालयाने मंगळवारी दिले. दरम्यान, बॅंकेच्या खातेदारांना दिलासा देण्याच्या मागणीची आणखी एक याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक असलेल्या वाधवा पिता-पुत्राने बनावट बोगस कागदपत्रे बनवून गैरव्यवहार केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरू केली असून, सुमारे ३००० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. सध्या दोन्ही आरोपींचा ताबा ईडीकडेच आहे. काही हवाला व्यवहारांचा तपास करायचा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार विशेष न्यायालयाने त्यांच्या कोठडीत २४ ऑक्‍टोबरपर्यंत वाढ केली. 
दरम्यान, पीएमसी बॅंकेच्या आणखी काही खातेदारांनी मंगळवारी उच्च न्यायालयात ॲड्‌. सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली. लग्न ठरल्यामुळे खरेदी आणि अन्य खर्च आहेत, नोकरीसाठी प्रशिक्षण घ्यायचे आहे, अशी कारणे देत या खातेदारांनी पीएमसी बॅंकेवरील रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली. या याचिकेवर लवकरच नियमित न्यायालयात सुनावणी होईल. यापूर्वी तीन याचिका दाखल झाल्या आहेत.

भांडुप पोलिसांत पीएमसी बॅंकेविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबईचा आर्थिक गुन्हे शाखा करीत असून, आतापर्यंत ४,३५५.४६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचे समोर आले आहे. त्यातून तब्बल नऊ लाख ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. 

हा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. गैरव्यवहारात बॅंकेचे संचालक मंडळ, एचडीआयएल कंपनीशी संलग्न असणाऱ्या ११ कंपन्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत.

महिला खातेदाराच्या आईचा हृदयविकाराने मृत्यू

पीएमसी बॅंकेत अडीच कोटी रुपये अडकलेल्या महिला खातेदाराच्या वृद्ध आईचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २२) घडली.  भारती सदारंगानी (७३) यांची कन्या हेमा यांच्या तब्बल अडीच कोटी रुपयांच्या ठेवी पीएमसी बॅंकेत अडकल्या आहेत. आपली मुलगी आणि जावयाचे पैसे अडकल्यामुळे त्या अनेक दिवसांपासून चिंताग्रस्त होत्या. त्यातच मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्‍क्‍यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांना कोणताही आजार नव्हता, अशी माहिती त्यांची मुलगी आणि जावयाने दिली.

‘पीएमसी’साठी मिसर सरकारी वकील

पीएमसी आर्थिक गैरव्यवहारात न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे.  ॲड. मिसर यांनी यापूर्वी सीबीआयकडील गुंतागुंतीच्या खटल्यांचे कामकाज पाहिले आहे. अनेक खटल्यांमध्ये सरकारची बाजू त्‍यांनी भक्कमपणे मांडलेली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wadhwas control is to ED